रायपूर, वृत्तसंस्था : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित झाल्यामुळे तेथे मुख्यमंत्रिपदाचा संभाव्य चेहरा कोण, याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण, भाजपने तेथे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला नव्हता. यावेळी विजय बघेल आणि माजी मुख्यमंत्री रमणसिंग यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. त्याखेरीज अन्य नावेही समोर आली आहेत. तथापि, हे राज्य आदिवासीबहुल असल्यामुळे तेथे कदाचित आदिवासी चेहराही अचानकपणे समोर येऊ शकतो.
रविवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन तासांमध्ये काँग्रेस आघाडीवर होता. नंतरच्या काही तासांत दोन्ही पक्षांत 'काँटे की टक्कर' परिस्थिती होती. मात्र नंतर भाजपने आघाडी घेतली. त्यामुळेच छत्तीसगडमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? याची चर्चा राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर होऊ लागली आहे. एकूण पाच चेहरे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.
खासदार विजय बघेल
खासदार विजय बघेल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा प्रबळ चेहरा म्हणून पाहिले जात आहे. यामागे दोन कारणे आहेत. बघेल हे ओबीसीच्या कुर्मी समाजातून येतात. मावळते मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही कुर्मी समाजातून येतात.
रमणसिंग यांचे पारडे जड
तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले रमणसिंग हेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आहेत. राजकीय निरीक्षकांच्या मते, पक्षात सुरुवातीला त्यांची काही काळ उपेक्षा झाली हे खरे असले तरी निवडणुका जवळ आल्यावर रमणसिंग यांना तिकीट देण्यात आले.
भाजप प्रदेशाध्यक्ष अरुण साओ
भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ हेही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होऊ शकतात. साओ हे ओबीसी समाजातील असून छत्तीसगडमध्ये ओबीसींची संख्या लक्षणीय आहे.
सरोज पांडे यांचेही नाव चर्चेत
राज्यसभेच्या खासदार आणि भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सरोज पांडे यांच्या गळ्यातही मुख्यमंत्रिपदाची माळ पडू शकते. भाजपचा विश्वासू चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. याखेरीज डॉ. रेणुका सिंह यांचे नावही चर्चेत आहे.