पुढारी ऑनलाईन डेस्क : पीएम नरेंद्र मोदी (PM Modi) आज (दि. ३) तीन राज्यातील विजयानंतर भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले. यावेळी त्यांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत जनतेचे आभार व्यक्त केले. यावेळी २०२४ च्या लोकसभेचं रणशिंग फुंकत त्यांनी आजच्या हॅट्रिकने २०२४ मध्ये भाजपच्या हॅट्रिकची गॅरंटी असल्याचा निर्धार व्यक्त केला.
ते म्हणाले की, मी आपल्या माता-भगिनी-लेकींसमोर, आपल्या युवक सहकाऱ्यांसमोर, शेतकरी बांधवांसमोर, आपल्या गरीब कुटुंबियांसमोर नतमस्तक होत आहे असं म्हणत त्यांनी आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, देशातील प्रत्येक स्त्री भाजपचे काम पाहत आहे. प्रत्येक स्त्रीने पाठिंबा दिलेला आहे, आशिर्वाद दिलेला आहे.
देशातील प्रत्येक आदिवासी समाज मनमोकळेपणाने मत व्यक्त करत आहे. यालाच तर विकास म्हटलं जातं. काँग्रेसच्या काळात ही परिस्थिती नव्हती म्हणूनच तर मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान सारख्या राज्यांमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे.
मी भविष्य सांगत नाही, पण मला राजस्थानच्या जनतेवर विश्वास होता. मध्यप्रदेशच्या जनतेने तर हे दाखवून दिले आहे की, त्यांचा भाजपवर दृढ विश्वास आहे. छत्तीसगडच्या जनतेचं देखील असंच आहे. म्हणूनच तर तिथे आपली सरकार आली. तेलंगणा जनतेचेही मनापासून मी आभार व्यक्त करत आहे. नड्डाजी भाजपसाठी दिवसरात्र झटत राहीलेले आहेत त्यामुळे त्यांचेही मी आभार मानतो. आजच्या निकालाने २०२४ च्या भाजपच्या हॅट्रिकची गॅरंटी दिली आहे.
भारतातील लोकशाही पद्धत आणि येथील व्यवस्थेकडे आज जगभरातील लोक आदर्श म्हणून पाहत आहेत. भारत माता की जय हाच आपला मंत्र आहे. भाजप सरकार फक्त नियोजन नाही बनवत तर, त्याची अंमलबजावणी करते, सत्यात उतरवते. स्वार्थ आणि देशहित यातील फरक जनतेला कळतो. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये जनतेची पसंती भाजपलाच आहे हे ठाम झालं आहे.
विरोधक केवळ तपास यंत्रणांनाच बदनाम करतात. आजचा विजय हा घमंडिया इंडिया आघाडीसाठी इशारा आहे. भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचं जनतेनं समर्थन केलेलं आहे. आजचा निकाल हा भ्रष्टाचारी लोकांना इशार आहे. जनतेच्या मनात घमंडिया सरकारबद्दल थोडा देखील विश्वास नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे जनता आता अशा लोकांना एक एक करत नष्ट करणार आहे असे प्रतिपादन पीएम मोदींनी केले.
भारत हा देश सर्वात वेगाने प्रगती करणारा देश आहे. अनेक नवनवीन व्यवसाय येत आहे. नवीन तंत्रज्ञानाला चालना मिळत आहे. होमलोनच्या संख्येत वाढ होत आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. त्यामुळे देशात मंदी येणार नाही हे ठामपणे मोदींनी सांगितले.
दरम्यान भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यावेळी सर्वांना संबोधित करताना सर्वांचे आभार मानले. सपने नहीं हकीकत बुनते हैं, तभी तो सब मोदी को चुनते हैं! अशी घोषणा देऊन त्यांनी बोलण्यास सुरुवात केली. देशात जर आता कोणती गॅरंटी असेल तर ती फक्त मोदींची गॅरंटी आहे. इंडिया आघाडीचे तुष्टीकरण, जातीयवाद, मतपेढीचे राजकारण आणि देशाचे विभाजन करण्याचे प्रयत्न मोदीजींच्या विकास भारी पडला. विकासाला आघाडीवर ठेवून या निवडणुकांचे निकाल देशाने मंजूर केले असल्याचे नड्डा यावेळी म्हणाले.
हेही वाचा