पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या दोन दिवसांपासून राज्याला अवकाळीने झोडपले आहे आज (दि.)३० देखील राज्यातील काही भागात पाऊस सुरूच आहे. दरम्यान पुढील २४ तासांत हवामान विभागाने विदर्भात गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशी माहिती IMD च्या आज (दि.३०) दुपारच्या बुलेटीनध्ये दिली आहे. (Weather Forecast)
राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज (दि.३०) आणि उद्या (दि.१) मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तसेच पुढील ४८ तासात मध्य प्रदेशसह विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, वाशिम या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असून, गारपीटीची दाट शक्यता आहे, असे देखील हवामान विभागाने आजच्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे. (Weather Forecast)
दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते पुढे तामिळनाडू-ओडिशाच्या दिशेने सरकत आहे. शुक्रवारी १ डिसेंबर दरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होऊन, २ ते ३ डिसेंबर दरम्यान हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तमिळनाडू, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात मुसळधारेची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर देखील दिसून येणार असून, या चक्रीवादळाला 'मिचॉन्ग' असे नाव देण्यात आले आहे.
बुधवारपासून(दि.२९) तामिळनाडून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने चेन्नई आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये २ आणि ३ डिसेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, तिरुवल्लूर, कांचीपुरम, चेन्नई, चेंगलपट्टू, विल्लुपुरम, कुड्डालोर, मायिलादुथुराई, नागापट्टिनम, तिरुवरूर, तंजावर, पुदुकोट्टई, रामनाथपुरम आणि थुथुकुडी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. चेन्नई प्रादेशिक हवामान खात्याने येत्या काही दिवसांत तामिळनाडूत (४ डिसेंबरपर्यंत) मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तामिळनाडूसह आंध्रप्रदेश, यनाम, पद्दुचेरी,कारिकाल, केरळ आणि माहे या भागात अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.(Tamil Nadu Rainfall)