नवी दिल्ली; पीटीआय : इस्रायलचा निषेध करणारा संयुक्त राष्ट्रसंघात जो ठराव मांडण्यात आला होता, त्याला भारताने पाठिंबा दर्शवून इस्रायलच्या विरोधात मतदान केले आहे. विशेष म्हणजे आठवड्यापूर्वी इस्रायल, हमास आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षावर मानवतेच्या द़ृष्टिकोनातून तोडगा काढला जावा याविषयीच्या ठरावावर भारताने तटस्थ राहण्याचे धोरण अवलंबले होते. दरम्यान, इस्रायल, हमास यांच्यातील युद्ध थांबविले जावे या प्रमुख मागणीसाठी लंडनमध्ये पॅलेस्टाईन समर्थकांनी विशाल मोर्चा काढला.
इस्रायलने पॅलेस्टाईनमध्ये आपल्या वसाहती तयार केल्याबद्दल त्या देशाचा निषेध करणारा हा ठराव मांडण्यात आला होता. अमेरिका आणि कॅनडाने या ठरावाला विरोध दर्शविला. अन्य अठरा देश तटस्थ राहिले. भारताच्या भूमिकेत झालेला हा बदल लक्षणीय ठरला असल्याचे मानले जात आहे. तथापि, यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या कायमस्वरूपी प्रतिनिधी योजना पटेल यांनी सांगितले की, भारताने घेतलेली भूमिका योग्य आहे. कोणताही धाकदपटशा, दहशतवाद आणि हिंसाचाराला भारताने नेहमीच विरोध केला आहे. तसेच या संघर्षावर वाटाघाटीद्वारे तोडगा काढला जावा, अशीच भारताची भूमिका राहिली आहे.
दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरूच असून गाझा पट्टीतील अल शिफा रुग्णालयाचा संपर्क तुटल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. दुसरीकडे, हमासकडून पॅलेस्टिनी नागरिकांचा वापर ढाल म्हणून केला जात असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. दोन्हीकडून हल्ले तीव्र करण्यात आल्यामुळे हा संघर्ष उत्तरोत्तर वाढतच चालला आहे. सात ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या युद्धात इस्रायल टीव्हीवर लोकप्रिय ठरलेल्या फाऊदा या मालिकेतील एक कलाकार मातन मेयर (38) याचा या युद्धात मृत्यू झाला आहे. तो आघाडीवर लढत होता.
पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी लंडनमध्ये सुमारे तीन लाख लोकांनी विशाल मोर्चा काढला होता. तातडीने युद्धविराम करावा अशी मागणी मोर्चेकर्यांनी केली. यावेळी मोर्चेकरी आणि पोलिस यांच्यात झटापट झाली.