नवी दिल्ली; वृत्तसंस्था : द़ृष्टिहीन, सेरेब्रल पाल्सी, अपंगत्व आलेल्या व्यक्तींकडून चालवल्या जाणार्या विशेष कॅन्टिनचे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व त्यांच्या सहकारी न्यायमूर्तींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
विशेष व्यक्तींसाठी कार्य करणार्या एका एनजीओच्या माध्यमातून 'मिट्टी कॅफे' नावाने हा कॅफे सुरू करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या या कॅफेच्या माध्यमातून तेथे येणार्या पक्षकार, वकील व न्यायमूर्तींसाठी हा कॅफे आहे. या कॅफेचे सारे कामकाज विशेष व्यक्तीच चालवतात. मॅनेजरपासून वेटरपर्यंत सारी कामे या विशेष व्यक्तींनी सांभाळली आहेत. यातील काही व्यक्ती द़ृष्टिहीन, सेरेब्रल पाल्सी आणि अपंगत्व आलेल्या आहेत.
शुक्रवारी एका छोटेखानी कार्यक्रमात सरन्यायाधीश व त्यांच्या सहकारी न्यायमूर्तींनी या कॅफेचे उद्घाटन केले. यावेळी एक सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आला. त्यात विशेष मुलांनी आपली कला सादर केली. या कार्यक्रमात हातवार्यांच्या भाषेत राष्ट्रगीतही सादर करण्यात आले. यावेळी बोलताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी समाजातील सर्व घटकांना पायावर उभे राहण्याचा अधिकार असून, त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे सांगत या कॅफेला प्रत्येकाने भेट द्यावी आणि या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहनही केले.