नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावरून शुक्रवार सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला फटकारले. दरवर्षी आम्ही हस्तक्षेप केल्यानंतरच कार्यवाही केली जाते. सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
गेल्या सहा वर्षांत दिल्लीतील प्रदूषणाबाबत काय केले. केवळ देवानेच दिल्लीकरांची प्रार्थना ऐकली आणि त्यामुळे गुरुवारी पाऊस झाला असल्याचे सांगत न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकारला जाबच विचारला. दिल्लीत गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक गेल्या आठ दिवसानंतर 400 च्या खाली आहे. यापूर्वी 2 नोव्हेंबर रोजी हवा गुणवत्ता निर्देशांक 346 इतका नोंदवला गेला. पाऊस झाल्याने हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा झाली आहे. दिवाळीनंतर हवा गुणवत्तेचा आढावा घेतला जाईल, असे दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाळ रॉय यांनी सांगितले.