रेल्वे चालवणार व्हेजिटेरियन फ्रेंडली गाड्या | पुढारी

रेल्वे चालवणार व्हेजिटेरियन फ्रेंडली गाड्या

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रवाशांना लवकरच ट्रेनमध्ये शुद्ध शाकाहारी जेवण मिळणार आहे. निवडक मार्गांवर ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) काही गाड्यांना सात्त्विक अन्न प्रमाणित करून ‘व्हेजिटेरियन फ्रेंडली’ प्रवासाला प्रोत्साहन देण्याची योजना आखत आहे. या निर्णयामुळे पहिल्यांदाच एजन्सी आणि त्यांच्या विक्रेत्यांद्वारे पूर्णत: शाकाहारी खाद्यपदार्थ दिले जातील, अशी माहिती भारतीय सात्त्विक परिषदेने (एससीआय) दिली आहे.

धार्मिक स्थळांना जोडणार्‍या मार्गांवर धावणार्‍या गाड्यांना ‘एससीआय’ सात्त्विक प्रमाणपत्र दिले जाईल, अशी माहिती समोर आली आहे. ‘आयआरसीटीसी’ची ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ही दिल्ली ते वैष्णोदेवी कटारादरम्यान धावते. या गाडीला सात्त्विक प्रमाणपत्र दिले जाईल.

याशिवाय इतर पवित्र ठिकाणी जाणार्‍या आणखी काही गाड्यांनाही हे प्रमाणपत्र मिळवून देण्याचा निर्णय ‘आयआरसीटीसी’ने घेतला आहे.
वाराणसीला जाणार्‍या ‘वंदे भारत’ ट्रेनसह आणखी 18 ट्रेनमध्ये हे प्रमाणपत्र देण्याची योजना आहे, अशी माहिती ‘एससीआय’च्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

सोमवारपासून ‘आयआरसीटीसी’च्या सहकार्याने सात्त्विक सर्टिफिकेशन स्कीम सुरू केली जाईल. यासोबतच शाकाहारी किचनसाठी एक पुस्तिकाही प्रकाशित करण्यात येणार आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या केवळ ट्रेनलाच नाही, तर प्रवाशांसाठी तयार केलेले किचन, दिल्ली आणि कटरा येथे प्रवाशांसाठी असलेले लाऊंज आणि जिंजर हॉटेलच्या एका मजल्यालाही सात्त्विक प्रमाणपत्र देण्याची योजना आहे.

Back to top button