चेन्नई; वृत्तसंस्था : वंदे भारत रेल्वेला मिळत असलेल्या उत्तम प्रतिसादानंतर रेल्वे आता नॉन एसी वंदे साधारण एक्स्प्रेस आणणार असून त्यामुळे आता कमी दरात आरामदायी व वेगवान प्रवासाची सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. या नवीन रेल्वेचा पहिला रेक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून या महिनाअखेरीस हा रेक तयार होईल, असे रेल्वेच्या अधिकार्यांनी सांगितले.
नवीन वंदे साधारण एक्स्प्रेस ही नॉन एसी गाडी राहणार असून 1800 प्रवाशांना 130 किमी प्रतितास वेगाने घेउन धावणारी ही 22 डब्यांची गाडी वंदे भारतला स्वस्तातला पर्याय असणार आहे. चेननईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत या गाडीचे डबे तयार झाले असून सध्या पेराम्बूर येथील प्रकल्पात या गाडीच्या दोन इंजिनांचे काम सुरू आहे. आरामदायी आसन व्यवस्था, उत्कृष्ट पॅनलिंग, एलईडी दिवे, पंखे व स्विचेस हे सारे नवीन प्रकारचे असणार आहेत. याशिवाय प्रत्येक सीटखाली मोबाईल चार्जिंगचे पॉईंट असतील. दिव्यांगांसाठी विशेष टॉयलेट आणि उद्घोषणांसाठी प्रत्येक डब्यात स्पीकर्स असतील तसेच वंदे भारतसारखेच दोन डब्यांना जोडणारे बंदिस्त गँगवे असतील. पुश आणि पुल पद्धतीने धावणारी ही रेल्वे जवळपास वंदे भारत एक्स्प्रेसच्याच वेगाने धावणार आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवासाचा अनुभव सुखद होणार आहे.
नवीन वंदे साधारण एक्स्प्रेस पहिल्या टप्प्यात पाच मार्गांवर धावणार आहे. रेल्वेने या मार्गांना मंजुरी दिल्याचे समजते. पाटणा-नवी दिल्ली, हावडा-नवी दिल्ली, हैदराबाद-नवी दिल्ली, मुंबई-नवी दिल्ली, एर्नाकुलम-गुवाहाटी हे ते मार्ग आहेत.