छेडछाडीला विरोध केल्यानेच कुस्तीपटू निशा दहिया हिची हत्या | पुढारी

छेडछाडीला विरोध केल्यानेच कुस्तीपटू निशा दहिया हिची हत्या

सोनिपत; वृत्तसंस्था : हरियाणातील सोनिपतमध्ये महिला कुस्तीपटू निशा दहिया आणि तिच्या भावाची बुधवारी हत्या करण्यात आली होती. छेडछाडीला विरोध केल्यामुळे तिच्या प्रशिक्षकानेच हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रशिक्षक पवन कुमारसह चारजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, नामसाधर्म्यामुळे राष्ट्रीय कुस्तीपटू निशा दहिया हिचीच हत्या झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, तिने स्वतःच एका व्हिडीओद्वारे त्याचे खंडन केले आहे.

सोनिपत जिल्ह्यातील हलालपूर गावात ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशीलकुमार याची एक कुस्ती अकादमी आहे. रोहतकमधील पवन कुमार हा ही अकादमी चालवितो. या अकादमीत निशा दहिया ही कुस्तीचे प्रशिक्षण घेत होती. बुधवारी ती अकादमीत गेल्यानंतर पवन कुमारने तिच्या घरी फोन करून आईला तेथे बोलावून घेतले. मुलगा सूरजसोबत त्या अकादमीत गेल्यानंतर निशाने आपली छेडछाड होत असल्याचे त्यांना सांगितले. तितक्यात पवन कुमार त्याची पत्नी, मेहुणा आणि अन्य एकजण तेथे आले. या प्रकाराचा जाब विचारला असता, पवन कुमारने आपल्याकडील पिस्तुलातून त्यांच्यावर गोळीबार केला. यात निशाचा जागीच मृत्यू झाला. आई जखमी झाली. मात्र, निशाचा भाऊ तेथून स्कुटीवरून पळण्याच्या तयारीत असताना पाठलाग करून त्याच्यावर गोळ्या झाडून त्याचीही हत्या करण्यात आली. नंतर घटनास्थळावरून आरोपी पसार झाले, असे निशाच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे.

फरार आरोपींवर १ लाखाचे बक्षीस

या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी अकादमीला आग लावली होती. आरोपींना तातडीने जेरबंद करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची मागणी निशाचे कुटुंबीय आणि गावकर्‍यांनी केली आहे. फरार असलेल्या आरोपींची माहिती देणार्‍यास पोलिसांकडून 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

Back to top button