नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर वाढण्याची शक्यता नाही. आंतरराष्ट्रीय पुरवठा चांगला आहे, तर कमी पावसामुळे देशातील सोयाबीन पीक अडचणीत आले आहे. तरीही खाद्यतेल कंपन्यांच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा नसल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. मात्र, सणासुदीच्या हंगामानंतर खाद्यतेलाचे दर यावर्षी डिसेंबर ते पुढील वर्षी एप्रिल-मार्चपर्यंत वाढू शकतात.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 1 जून ते 4 ऑगस्टदरम्यान भारतातील 717 पैकी 287 जिल्ह्यांमध्ये पावसात घट झाली आहे. कमी पावसामुळे या राज्यात भाताबरोबरच इतर काही पिकांनाही फटका बसणार आहे. सत्राच्या दुसर्या आणि तिसर्या तिमाहीत ग्राहकांना खाद्यतेलासह काही जीवनावश्यक वस्तूंवर अधिक पैसे मोजावे लागतील, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अदानी विल्मरचे व्यवस्थापकीय संचालक अंगशु मल्लिक यांनी सांगितले की, भारताने खाद्यतेल मोठ्या प्रमाणावर आयात केले आहे. त्यामुळे त्याच्या किमती वाढणार नाहीत. परंतु अपुर्या मान्सूनमुळे सोयाबीन पिकावर परिणाम होईल, त्याचा वापरावर परिणाम होऊ शकतो, अशा स्थितीत भाव स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.