Chandrayaan-3 Mission Updates | स्माईल प्लीज! चांद्रयान-३ च्या प्रज्ञान रोव्हरने टिपली विक्रम लँडरची छायाचित्रे, ISRO ची माहिती

Chandrayaan-3 Mission Updates | स्माईल प्लीज! चांद्रयान-३ च्या प्रज्ञान रोव्हरने टिपली विक्रम लँडरची छायाचित्रे, ISRO ची माहिती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : चंद्राच्या पृष्ठभागावर फेरफटका मारणाऱ्या चांद्रयान-३ च्या प्रज्ञान रोव्हरने आज सकाळी विक्रम लँडरची छायाचित्रे टिपली आहेत. याबाबतची अपडेट इस्रोने (ISRO) एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत दिली आहे. रोव्हरवरील (NavCam) ऑनबोर्ड नेव्हिगेशन कॅमेऱ्याने ही छायाचित्रे टिपली आहेत. चांद्रयान-३ मोहिमेसाठी नवकॅम्स इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम (LEOS) च्या प्रयोगशाळेने विकसित केले आहे. (Chandrayaan-3 Mission Updates)

"स्माईल प्लीज! प्रज्ञान रोव्हरने आज सकाळी विक्रम लँडरची टिपलेली छायाचित्रे." अशी कॅप्शन देत इस्रोने ही छायाचित्रे शेअर केली आहेत. याआधी विक्रम लॅंडरने पुष्ठभागावर फिरणाऱ्या रोव्हरची छायाचित्रे टिपली होती. आता रोव्हरने पहिल्यांदाच लॅंडरची छायाचित्रे टिपली आहेत.

इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम्स (LEOS) साठीची प्रयोगशाळा बंगळूर येथे पेन्या इंडस्ट्रियल इस्टेट येथे आहे जिथे १९७५ मध्ये पहिला भारतीय उपग्रह तयार करण्यात आला होता.

दरम्यान, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमानाबाबत धक्कादायक नोंदी करणार्‍या चांद्रयानाच्या रोव्हरने केलेल्या चाचण्यांत तेथे गंधक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याचे नुकतेच समोर आणले आहे. चंद्राच्या भूमीवर पाय ठेवल्यापासून सहा दिवसांत रोव्हरने महत्त्वाची माहिती पाठवली असून वैज्ञानिक त्याचा अभ्यास करीत आहेत. (Chandrayaan-3 Mission Updates )

चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक उतरलेल्या विक्रम लँडरमधील रोव्हरने आपले काम सुरू केले आहे. त्याच्या हातात सूर्यप्रकाशाचे अवघे १४ दिवस असल्याने त्याच्या कामाचा वेग वाढला आहे. तीन दिवसांपूर्वी रोव्हरने तापमानाबाबत नोंदी पाठवत चंद्राच्या पृष्ठभागावर उणे १० अंश ते ६० अंश तापमान असल्याची महत्त्वाची माहिती पाठवली होती. त्याचे विश्लेषण करण्यात शास्त्रज्ञ गुंतले असताना आता नवीन माहिती समोर आली आहे. (Chandrayan 3)

रोव्हरवर बसवलेल्या लेझरयुक्त स्पेक्ट्रोमीटरचा वापर करून चंद्रावर कोणते रासायनिक घटक आहेत याचा शोध घेतला आहे. त्यात चंद्रावर गंधक उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर लेझर किरणांच्या मदतीने हा अभ्यास करण्यात येत आहे. अपेक्षेनुसार चंद्रावर अ‍ॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटानियम, सिलिकॉन, मँगेनिज आणि ऑक्सिजन असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. हायड्रोजनचा शोध सुरू आहे, असे यापूर्वी इस्रोने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने चांद्रयान-३ च्या रोव्हरचा एक व्हिडिओ याआधी जारी केला होते. चांद्रयान-३ च्या लँडरमधून रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर कसे उतरले याचा हा व्हिडिओ होता. इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील विश्वविक्रमी सॉफ्ट लँडिंगनंतर २ तास २६ मिनिटांनी विक्रम लँडरमधून बाहेर पडलेले 'प्रज्ञान' रोव्हर चंद्रावर उतरले. त्याने विशिष्ट परिघात चंद्राच्या पृष्ठभागावरील आपला स्वतंत्र प्रवास सुरू केला. रोव्हर चंद्रावरील गूढ गोष्टींचा शोध घेत आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news