पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका शाळेतील मुलाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत एक शिक्षिका वर्गातील मुलांना दुसऱ्या एका मुस्लिम मुलाला कानशिलात मारण्यास सांगत असल्याचे दिसते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शिक्षिकेविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ आणि ५०४ नुसार एफआयआर नोंद करण्यात आले आहे. मुलाला गुणाकार येत नसल्याने त्याला शिक्षा म्हणून मारहाण करण्यास सांगण्यात आले होते. (UP school viral video)
व्हायरल व्हिडिओवर एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना, पोलिस अधीक्षक सत्यनारायण प्रजापत यांनी सांगितले की, "आज मंसूरपूर पोलिसांना एक व्हिडिओ मिळाला, ज्यामध्ये एका महिला शिक्षिका गुणाकार येत नसल्याने वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या एका वर्गमित्राला मारहाण करण्यास सांगते. या व्हिडिओत काही आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या आहेत."
या घटनेबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना कळवण्यात आले असून महिला शिक्षिकेवर विभागीय कारवाई करण्यात येईल, असे प्रजापत पुढे म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी या व्हायरल व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले आहे की, "निरागस मुलांच्या मनात भेदभावाचे विष पेरले जात आहे. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी द्वेषाचे वातावरण तयार होत आहे. भाजपने हे द्वेषाचे वातावरण तयार केले असून ते देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे. मुले हे भारताचे भविष्य आहेत. त्यांच्यात द्वेष निमार्ण करू नका, आपण सर्वांनी मिळून प्रेम शिकवायचे आहे."
दरम्यान, त्या शिक्षिकेने तिच्या कृत्यावर माफी मागितली आहे. तिने हा व्हायरल व्हिडिओ दिशाभूल करणारा असून व्हिडिओत छेडछाड करण्यात आल्याचा दावा आहे. (UP school viral video)
मुझफ्फरनगरमधील एका मान्यताप्राप्त शाळेतील हा व्हिडिओ आहे, जो पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक शिक्षिका वर्गात खुर्चीवर बसली आहे. समोर एक निरागस मुलगा रडत आहे. शिक्षकांच्या सांगण्यावरून वर्गातील विद्यार्थी एकामागून एक उभे येऊन त्या मुलाला कानशिलात मारतात, असे व्हिडिओत दिसते. या घटनेची गंभीर दखल घेत चौकशी केली जात आहे.
हे ही वाचा :