मुंबई; पुढारी वृत्तसेवा : केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिमा स्वच्छ असून ती विकासाची प्रतिमा आहे. मात्र अंतर्गत राजकारणातून त्यांचा काटा काढण्यासाठीच 'कॅग'चा अहवाल आणण्यात आला आहे. त्यातून त्यांना बाजूला करायचे, हा द़ृष्टिकोन असू शकतो, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
कॅगच्या अहवालात केंद्रातील सहा योजनांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यांवर अधिक ताशेरे ओढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर निशाणा साधला.
प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार असताना कॅगने फक्त गडकरींच्या खात्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यावरून सर्व काही स्पष्ट होते. पण पंतप्रधान हे रस्ते समितीचे अध्यक्ष असतात. मग पंतप्रधानांची भूमिका काय हा प्रश्न उपस्थित होतो. यासंदर्भात केंद्र सरकार काय कारवाई करणार याकडे आमचे लक्ष आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.