नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : अदानी विरुद्ध हिंडेनबर्ग प्रकरणात तपास पूर्ण करण्यासाठी आणि चौकशीचा स्थिती अहवाल सादर करण्यासाठी सेबीने (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) सर्वोच्च न्यायालयाकडे आणखी १५ दिवसांचा वेळ मागितला आहे.
अमेरिकेची शॉर्ट सेलर संस्था हिंडनबर्गने अदानी उद्योग समूहाच्या कामकाजात हेराफेरी असल्याचा सनसनाटी आरोप करुन खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाचे संसदेतही तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. प्रकरणाच्या एकूण चौकशीसाठी न्यायालयाने विशेष समितीची स्थापना केली होती. समितीने आपला अहवाल याआधीच न्यायालयाकडे सोपविलेला आहे.
हिंडनबर्गने अदानी समुहावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सेबीने सर्वोच्च न्यायालयाकडे याआधीही अतिरिक्त वेळ मागितला होता. त्यानुसार गेल्या मे महिन्यात न्यायालयाने सेबीला तीन महिन्यांचा वेळ दिला होता. सेबीने चौकशी पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची वेळ मागितली होता, तथापि तीन महिन्यांत म्हणजे १४ ऑगस्टपर्यंत तपास पूर्ण करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. दरम्यान, आज पुन्हा सेबीने १५ दिवसांचा अवधी मागितला आहे.
नियामक व्यवस्था फोल ठरल्याचा निष्कर्ष अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात काढता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या न्या. सप्रे समितीने काढला होता. अदानी-हिंडनबर्ग प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयाने नेमलेल्या विशेषतज्ज्ञ समितीचा अहवाल याआधीच सार्वजनिक झाला आहे. या अहवालानंतर अदानी समुहाला मोठा दिलासा मिळाला होता. अदानी समुहाने कुठलीही आर्थिक माहिती लपवली नसल्याचे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या १७३ पानी अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. अदानी समूहाच्या समभागाची सेबी ऑक्टोबर २०२० पासून तपास करीत आहे.पण अद्याप समूहाच्या बाजूने अथवा विरोधात कुठलेही निर्णायक पुरावे मिळाले नसल्याचे समितीने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे.
दरम्यान, एफपीओच्या वेळी जाणूनबुजून हिंडेनबर्गने आपले हितसंबंध साध्य करण्यासाठी अडाणी समूविरोधात अहवाल प्रकाशित केला, असा पलटवार गौतम अदानी यांनी अमेरिक शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्च वर केला. अहवालाचा परिणाम अडाणी समूहाच्या शेअर्सच्या किमतीवरही दिसून आला आणि बरेच चढउतार दिसून आले. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही सार्वजनिक ऑफरचा पाठपुरावा मागे घेतला जेणेकरून त्यांना हिंडनबर्ग अहवालाचा नकारात्मक परिणाम सहन करावा लागू नये, असे अदानी यांनी याआधी स्पष्ट केले होते. समूहाचे नुकसान करण्याच्या हेतूने हिंडेनबर्गने त्यांच्या अहवालातून खोटे आणि निराधार आरोप केले. अदानी समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण (एजीएम) सभेत अदानी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करीत हिंडनबर्ग रिसर्च अहवालाचा उद्देश अदानी समूहाचे शेअर्स कमी करून नफा कमावण्याचा होता, असा दावा केला होता.
हे ही वाचा :