पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेशात गेल्या 24 तासांत संततधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. सोलनमधील कांदाघाट उपविभागातील जदोन गावात ढग फुटी झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आणि तीन बेपत्ता आहेत. या घटनेत दोन घरे आणि एक गोठ्यात वाहून गेल्याचे वृत्त आहे. तर एसडीएम कंडाघाट, सिद्धार्थ आचार्य यांनी सांगितले की, जदोन गावात ढगफुटीच्या घटनेनंतर पाच जणांना वाचवण्यात आले.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये १४ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली. स्थानिक हवामान खात्याने १४ ते १७ ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याचा पिवळा इशारा जारी केला आहे. आणि 19 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
ढगफुटीमुळे मंडी जिल्ह्यातील सरकाघाट भागातील दोन गावांमधील शेतजमीन आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे – घोमू आणि जावळी – आणि नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत, मंडीचे एसपी सौम्या संबसिवन यांनी पीटीआयला सांगितले.
गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने हमीरपूर जिल्ह्यातील सर्व भागात कहर केला आहे, ज्यामुळे बियास नदी आणि तिच्या उपनद्यांना उधाण आले आहे. अधिका-यांनी सांगितले की, मान आणि कुनाचे नाले ज्या भागात आहेत ते सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत. पाऊस आणि भूस्खलनामुळे हमीरपूरच्या सर्व भागात पिके, सुपीक जमीन आणि अधिकृत आणि खाजगी इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने लोकांना बाहेर पडू नये आणि बियास नदीकाठ आणि नाल्यांजवळ जाण्याचे टाळण्याचा इशारा दिला आहे.