वाराणसी, पुढारी ऑनलाईन : अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला वाराणसीतील ज्ञानवापी मशीद परिसराचे सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली आहे. (Gyanvapi Case) ज्ञानवापी मशीद परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करणे आवश्यक आहे, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, ज्ञानवापी मशीद परिसराचे पुरातत्व विभागाचे सर्वेक्षण थांबवण्याची ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
वाराणसी जिल्हा न्यायाधीशांच्या ज्ञानवापी मशिदीच्या एएसआय (ASI) सर्वेक्षणाच्या २१ जुलैच्या आदेशाला अंजुमन इंतेजामिया मशिद समितीने आव्हान दिले होते. ही याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रितिंकर दिवाकर यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळताना म्हटले की, "वाराणसी न्यायालयाने मशिद परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचा दिलेला आदेश योग्य होता. न्यायाच्या दृष्टीने वैज्ञानिक सर्वेक्षण आवश्यक आहे."
उच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिद परिसरात असलेल्या शिवलिंग सारखे दिसणाऱ्या संरचनेचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. ही संरचना किती जुनी आहे हे या सर्वेक्षणातून समोर येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ने २४ जुलै रोजी ज्ञानवापी येथे सर्वेक्षणास प्रारंभ केला होता. ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समिती आणि अंजुमन इंतेजामिया मशिद यांनी वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाला बुधवार, २६ जुलैपर्यंत स्थगिती दिली होती. वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी मुस्लिम पक्षाने उच्च न्यायालयात जावे, असेही निर्देशही दिले होते.
हे ही वाचा :