नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. सोमवारी 7 ऑगस्ट अथवा मंगळवारी 8 ऑगस्ट रोजी ही चर्चा होऊ शकते.
चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित राहतील. चर्चेसंबंधी सोमवारी 31 जुलै ला अंतिम निर्णय होऊ शकतो. 19 जुलै रोजी विरोधकांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावासंबंधी लोकसभेत अध्यक्षांना नोटीस दिले होते.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अविश्वास प्रस्तावासंबंधीची नोटीस स्वीकारली होती. नियमानुसार प्रस्तावावर 10 दिवसांच्या आत चर्चा घडवून आणावी लागते. दरम्यान अविश्वास प्रस्तावासंबंधी नोटीस स्वीकारण्यात आल्यानंतर देखील विधेयक सादर करीत ते पारित करून घेण्याच्या सरकारने लावलेला सपाट्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता.
विरोधकांकडून अचानक अविश्वास प्रस्ताव आणण्यात आल्यानंतर सरकारी नियोजित कामकाज रोखले जाऊ शकत नाही, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांकडे बहुमत असेल तर त्यांनी विधेयक पारित होऊ देऊ नये, असा टोला देखील जोशी यांनी लगावला. अविश्वास प्रस्तावावर निश्चित वेळेच्या आत चर्चा होईल आणि सरकारकडून उत्तर देखील दिले जाईल, असे जोशी यांनी स्पष्ट केले.