थिरुअनंतपूरम; वृत्तसंस्था : वासनामूलक हेतूशिवाय एखाद्या महिलेचा हात पकडण्याच्या कृत्याला विनयभंग म्हणता येणार नाही, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.
2013 मधील एका खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने म्हटले आहे की, यातील आरोपीने एका महिलेचा हात पकडून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी त्याच्यावर गुन्हा दाखल करताना त्यामध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यासह विनयभंगाचे कलमही लावण्यात आले होते. मात्र, आरोपीने कोणतेही असभ्य शब्द उच्चारले किंवा पीडितेला विचित्र पद्धतीने स्पर्श केल्याचे निष्पन्न झालेले नाही. प्राणघातक हल्ल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करताना त्यात विनयभंगाच्या कलमाचाही समावेश करणे चुकीचे आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणात न्यायालयाने आरोपीला संबंधित महिलेवर हल्ला केल्याबद्दल दोषी ठरविले आहे. तथापि, विनयभंगाचा विषय रद्दबातल ठरविला आहे.