पुढारी ऑनलाईन डेस्क : समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ पिंपळखुटा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडरला धडकून उलटली. यानंतर ट्रॅव्हल्स बसने पेट घेतल्यामुळे २६ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे तर सातजण वाचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत आणि जखमींना ५० हजारांची मदत पंतप्रधान 'राष्ट्रीय मदत निधीतून' जाहीर केली आहे. (Buldhana Bus Accident)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत, समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ पिंपळखुटा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसच्या झालेल्या भीषण अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि मदत जाहीर केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, "महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेने अतिशय दु:ख झाले. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आणि प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे. बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना (PMNRF-PM National Relief Fund) पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाखांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.
बुलढाणा बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. "घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आणि दुख:द आहे. यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ८ लोक जखमी आहेत. मी आयजी आणि कलेक्टर यांच्याशी बोललो आहे. जखमींवर मोफत उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देण्याचा निर्णय झाला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले."
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व दु:खद आहे. अपघातातील मृतांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य मिळावे, अशी प्रार्थना करतो. ईश्वर दिवंगतांना शांती प्रदान करो. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत.
हेही वाचा