भारतात आयव्हीएफ तंत्रातून बन्‍नी म्हशी चे पहिलेच रेडकू | पुढारी

भारतात आयव्हीएफ तंत्रातून बन्‍नी म्हशी चे पहिलेच रेडकू

सोमनाथ (गुजरात) ; वृत्तसंस्था : अपत्यहीन दाम्पत्यांसाठी आयव्हीएफ तंत्रज्ञान वापरले जाते. मात्र, आयव्हीएफ तंत्र उपयुक्‍ततेच्या बाबतीत आता केवळ मानव जातीपुरते मर्यादित राहिलेले नसून जनावरांवरही याचा प्रयोग सुरू झाला आहे. गुजरातच्या सोमनाथ जिल्ह्यातील धनेज येथे बन्‍नी म्हशी जातीच्या एका म्हशीने आयव्हीएफ तंत्राच्या मदतीने रेडकू जन्माला घातले आहे.

विनय नावाच्या शेतकर्‍याकडे बन्‍नी जातीच्या 6 म्हशी आहेत. त्यापैकी एका म्हशीने देशातील पहिले बन्‍नी आयव्हीएफ रेडकू जन्माला घातले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 15 डिसेंबर 2020 रोजी गुजरातमधील कच्छच्या भेटीदरम्यान म्हशीच्या बन्‍नी जातीबद्दल भरभरून बोलले होते. नंतर शास्त्रज्ञांनी विनयच्या मालकीच्या सुशीला अ‍ॅग्रो फार्ममधील 3 बन्‍नी म्हशींवर आयव्हीएफ पद्धतीचा प्रयोग केला.

यापैकी एका म्हशीने शनिवारी पहिल्या आयव्हीएफ बन्‍नी रेडकाला आज जन्म दिला. देशातील पशुधन विकासासाठी सरकार म्हशींच्या आयव्हीएफ उत्पत्तीला प्रोत्साहन देते. या तंत्राने पैदास केल्यास हाती येणार्‍या म्हशी अधिक प्रमाणात व गुणवत्तापूर्ण दूध देतात, असे अनुभवांती सिद्ध झाले आहे.

भारतात म्हशीच्या 26 जाती

जगात सर्वाधिक म्हशी भारतात आहेत. भारतात म्हशींच्या 26 जाती आहेत. त्यापैकी 12 जाती नोंदणीकृत आहेत, ज्या जास्तीत जास्त दूध देतात. यामध्ये मुर्‍हा, निलीरावी, जाफराबादी, नागपुरी, पंढरपुरी, बन्नी, भदावरी, चिलका, मेहसाणा, सुरती, टोडा या जातीच्या म्हशींचा समावेश आहे.

आयव्हीएफ पद्धती देशातील दुग्ध उत्पादन वाढीला मदत करेल. या तंत्राने पैदास केल्यास हाती येणार्‍या म्हशीच्या दुधात उच्च पौष्टिक मूल्ये असतील.
– डॉ. नितीन मार्कंडेय, अधिष्ठाता, पशु वैद्यकीय महाविद्यालय, परभणी कृषी विद्यापीठ

Back to top button