नवीन संसद भवनाला महाराष्ट्राच्या सागवानाची चकाकी | पुढारी

नवीन संसद भवनाला महाराष्ट्राच्या सागवानाची चकाकी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  वैविध्याने नटलेल्या भारताच्या कानाकोपर्‍यातून मागवलेल्या साहित्याने भारताची नवीन संसद नटली आहे. त्यात महाराष्ट्राचाही मोठा वाटा आहे. इमारतीत वापरण्यात आलेले अस्सल सागवान नागपूरहून मागवण्यात आले आहे तर अशोक चिन्हासाठी लागणारे साहित्य छत्रपती संभाजीनगरहून मागवले गेले आहे. संसद भवनातील सारे फर्निचर महाराष्ट्राच्या राजधानीत तयार करण्यात आले आहे.

नवीन संसद भवनाची उभारणी करताना ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उक्तीनुसार कामांची विभागणी केली गेली. समग्र देशाचा या संसद भवनात सहभाग असायला हवा या हेतूने ठरवून देशाच्या कानाकोपर्‍यातून साहित्य मागवले गेले. अगदी बांबूपासून ते दगडी कोरीव जाळ्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट ज्या भागाचे वैशिष्ट्य आहे तेथून तयार करून मागवण्यात आली. नवीन संसद भवनात देशाची वैविध्यपूर्ण संस्कृतीची झलक बघायला मिळणार आहे. जणू काही सार्‍या देशाने मिळून ही इमारत उभारली आहे. तीन वर्षांच्या या बांधकामात देशाच्या कानाकोपर्‍यातून साहित्य मागवण्यात आले आहे.

नवीन संसद भवन

कोणत्या राज्यातून काय आले

नागपूर : बांधकामासाठी लागणारे सर्व सागवान
छत्रपती संभाजीनगर : अशोक चिन्हाचे साहित्य
मुंबई : या इमारतीतील सारे फर्निचर तयार झाले
त्रिपुरा : फरशीसाठीचे बांबू
मिर्झापूर (उत्तर प्रदेश) : शानदार गालिचे
सरमथुरा (राजस्थान) : लाल-पांढरे वाळूंचे दगड
उदयपूर : भगवा-हिरवा दगड
लाखा (अजमेर) : लाल ग्रॅनाईट
अंबाजी : पांढरा संगमरवर
दमण-दीव : फॉल्स सिलिंगसाठी स्टीलचे सांगाडे
राजनगर (राजस्थान), नोएडा : दगडी जाळीचे काम
इंदूर (मध्य प्रदेश) : अशोक चक्र

Back to top button