धक्कादायक: पत्नीच्या बेडरूममध्ये सोडला साप; सर्पदंश करून खून | पुढारी

धक्कादायक: पत्नीच्या बेडरूममध्ये सोडला साप; सर्पदंश करून खून

पुढारी ऑनलाईन डेस्क

पती पत्नीचे पटत नाही म्हणून अनेकदा जिवावर उठण्याचे प्रकार घडतात ( सर्पदंश करून खून ). मात्र, पत्नीचा केलेला खून हा नैसर्गिक मृत्यू वाटावा इतक्या सफाईदारपणे एका तरुणाने आपल्या पत्नीचा खून केला. सर्पमित्राकडून साप खरेदी करून तो पत्नीला चावेल अशा ठिकाणी ठेवला. एक नव्हे तर तब्बल दोन सापांचा दंश पत्नीला झाल्याने ती मृत्यूमुखी पडली. या नियोजनबद्ध खूनाचा तपास पोलिसांनीही तितक्याच शिताफीने लावला.

पोलिसाच्या या तपासावर कोर्टही खूश झाले आणि त्यांनी शाबासकी दिली.

विषारी नाग पत्नीच्या पाळतीवर होते आणि त्यांनी तिला दोन वेळा चावले असा दावा करून त्याला अंधश्रद्धेचा मुलामा देणारा पती आता पोलिसांच्या जाळ्यात असून त्याच्याविरोधात गुन्हाही सिद्ध झाला आहे. कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

तिरुअनंतपुरमजवळील एका गावात उत्तरा आणि तिचा पती राहत होते. ती दिव्यांग होती. तरीही केवळ इस्टेटीसाठी संबधित तरुणाने तिच्याशी लग्न केले. उत्तराच्या माहेरून संपत्ती मिळाल्यानंतर त्याने तिला ठार मारण्याचा प्लॅन तयार केला. त्यानुसार त्याने कुणाच्या डोक्यातही येणार नाही असे नियोजन केले. त्याने एका सर्पमित्राला गाठले आणि त्याच्याकडून साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतले. तसेच त्याने इंटरनेटवर साप पकडण्याची माहिती घेतली.

सर्पदंश करून खून : साप विकत घेतला

त्यानंतर त्याने सर्पमित्राकडून घोणस जातीचा साप विकत घेतला. दुसऱ्या दिवशी त्याने सर्पमित्रासमोर साप पकडण्याचे प्रात्यक्षिक केले. हा घोणस त्याने घरी आणला आणि जिन्याच्या पायरीवर ठेवला. त्यानंतर उत्तरा वरच्या मजल्यावर जात असताना तिला घोणस चावला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. तरी बरी झाली. त्यानंतर उत्तराच्या आई-वडिलांनी तिला माहेरी नेण्याची ईच्छा व्यक्त केली. तसेच तिचे दागिने परत करण्यास सांगितले. यावेळी पतीने रडून आपले पत्नीवर किती प्रेम आहे, हे सांगून सासू सासऱ्यांचा विश्वास मिळविला. २७ फेब्रुवारी रोजी पहिला दंश झाला त्यावेळी त्याने साप पायऱ्यांवर ठेवून तिला मोबाइल आणण्यास सांगितले. त्यावेळी साप पाहून ती ओरडली. त्यानंतर पतीने साप पकडला. त्याचे ते कौशल्या पाहून पत्नीलही आश्चर्यचकित झाली.

त्यानंतर ३ मार्च रोजी ती दुसऱ्या मजल्यावर पलंगावर झोपली होती. त्यावेळी तिला पुन्हा सर्पदंश झाला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले मात्र ती वाचू शकली नाही.

या प्रकरणात संबधित तरुणीच्या घरच्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणाचा तपास कोलम पोलिसांनी शिताफीने केला. ज्याप्रकारे दोन वेळा सर्पदंश झाला ते पाहता या प्रकरणाचे गूढ वाढले होते. पतीने असा बनाव केला होता की, दोन साप तिचा पाठलाग करत होते आणि त्यातून त्यांनी दंश केला आहे.

दातांचे व्रण संशयास्पद

पीएम रिपोर्टमध्ये सर्पदंशावेळी सापाच्या खालच्या आणि वरच्या दातांचे अंतर हे २.३ ते २. ८ सेमी होते. नैसर्गिक अधिवासात चावा घेतल्यास हे अंतर निम्मे असते. याचाच अर्थ सापाचे तोंड उघडे ठेवून हा दंश झाला होता, हे सिद्ध होते. पत्नीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पती कोब्राची माहिती इंटरनेटवर शोधत होता. तसेच मित्रांकडे कोब्रा कुणाकडे मिळेल याचाही शोध घेत होता. त्यानंतर त्याने पहिल्यांदा ज्याच्याकडून घोणस विकत घेतला त्याच्याकडून कोब्रा विकत घेतला. तो कोब्रा त्याने एका बरणीत घालून ठेवला. ६ मे रोजी संधी मिळताच त्याने बेडरूममध्ये झोपलेल्या उत्तराजवळ कोब्रा नेला आणि त्याचा दंश केला. त्यात तिचा मृत्यू झाला. त्या दिवशी पती लवकर उठून बेडरूममधून बाहेर आला.

ठिकाण सांगू शकला नाही

साप जेथे चावला ते ठिकाण तो नीट सांगू शकला नाही. या प्रकाराचा पोलिसांना संशय आला. या दोन्ही दंशावेळी पती तिच्यासोबत होता. तसेच पीएम रिपोर्टमध्ये दोन वेळा सर्पदंश झाला त्यावेळी तिच्या शरीरात गुंगीचे औषध असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. या तपासात सायबर तज्ज्ञांची मदतही घेतली. त्यानुसार त्याने मोबाइलवरून शोधलेले कोब्राचे फोटो सापडले. तसेच माफीचा साक्षीसार सर्पमित्रानेही जबाब दिला, त्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली.

सर्पदंश करून खून : साप खोलीत गेलाच नाही

या प्रकरणात पोलिसांनी शिताफीने तपास केला. चार्टशीट तयार करताना सर्पतज्ज्ञांचा अहवालही मिळविला. त्यानुसार साप किती वर चढू शकतो याचा अहवाल दिला. साप आपल्या लांबीच्या एक तृतीयांश शरीर वर उचलतो. तर कोब्रा केवल ६० सेंटीमीटर शरीर उचलू शकतो. ५० सें.मी. शरीर वर उचलू शकतो. कोब्रा कोणत्याही आधाराशिवाय भिंत, गुळगुळीत पाइपवर चढू शकत नाही. तसेच घोणस हा पायरी किंवा पलंगावर चढत नाही. तरीही तो पलंगावर कसा गेला याबाबत संशय होता.

हेही वाचा : 

Back to top button