7 New Defence Firms : पीएम मोदींकडून सात लष्करी कंपन्या राष्ट्राला अर्पण | पुढारी

7 New Defence Firms : पीएम मोदींकडून सात लष्करी कंपन्या राष्ट्राला अर्पण

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

संरक्षण साहित्याच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सात लष्करी सामग्री उत्पादक कंपन्यांची ( 7 New Defence Firms) स्थापना केली आहे. विजया दशमीचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कंपन्या शुक्रवारी राष्ट्राला अर्पण केल्या. संरक्षण सज्जता वाढविण्यात या कंपन्या मोलाचा हातभार लावतील, असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
उज्ज्वल भवितव्यासाठी देश संकल्प करीत असून 41 विद्यमान कंपन्यांची पुनर्रचना व सात नवीन कंपन्यांची स्थापना हा त्याचा भाग असल्याचे मोदी यांनी नमूद केले. नवीन कंपन्यांच्या स्थापनेबाबतचा निर्णय 15 ते 20 वर्षांपासून लांबणीवर पडला होता, पण आता हा प्रश्न मार्गी लागला आहे, असेही ते म्हणाले.
सात नवीन कंपन्यांमध्ये (7 New Defence Firms) म्युच्युएशन इंडिया लिमिटेड, लष्करी वाहन निगम लिमिटेड, आधुनिक शस्त्रास्त्रे आणि उपकरण इंडिया लिमिटेड, सैनिक सुविधा लिमिटेड, यंत्र इंडिया लिमिटेड आणि इंडिया ऑप्टेल लिमिटेड यांचा समावेश आहे.
तिन्ही लष्करी दलांकडून या सात कंपन्यांना आगामी काळात 65 हजार कोटी रुपयांची 66 कामे दिली जाणार आहेत, अशी माहिती मोदी यांनी दिली. एकेकाळी भारताचे दारूगोळा कारखाने जगात सर्वाधिक शक्तिशाली होते. दुसऱ्या महायुद्धावेळी जगाने भारतीय दारूगोळा करखान्यांची ताकत पाहिली होती, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या कारखान्यांचे आधुनिकीकरण करण्याची, नवे तंत्रज्ञान अंगिकरण्याची व त्यांच्यात सुधारणा करण्याची गरज होती. पण तत्कालीन सरकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
आपल्या कारखान्यांकडे 100 ते 150 वर्षांचा अनुभव आहे. आपल्याला हे गतवैभव पुन्हा प्राप्त करावयाचे आहे, असे मोदी म्हणाले. देशातील स्टार्ट अप्सनी संरक्षण क्षेत्राच्या विकासासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचेही यावेळी भाषण झाले.
हे ही वाचलं का?

Back to top button