लोकसंख्येचं वाढतं असंतुलन घातक, लोकसंख्या धोरणाचा पुनर्विचार व्हावा : सरसंघचालक मोहन भागवत | पुढारी

लोकसंख्येचं वाढतं असंतुलन घातक, लोकसंख्या धोरणाचा पुनर्विचार व्हावा : सरसंघचालक मोहन भागवत

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

वाढती लोकसंख्या जशी समस्या असू शकते, त्याचप्रमाणे लोकसंख्येचा असमतोलही समस्या ठरू शकतो तर लोकसंख्येचा असमतोल हा घातक ठरू शकतो. त्यामुळे देशात असलेल्या लोकसंख्या धोरणाचा पुनर्विचार करून पुनर्निर्धारण करण्याची गरज असल्याचे परखड मत सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी आज नागपुरात व्यक्त केले.

एवढंच करून चालणार नाही तर लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा समाजाच्या सर्व वर्गावर एकसमान लागू केला पाहिजे असेही डॉ भागवत यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव नागपुरातील रेशीमबाग मैदानावर साजरा करण्यात आला. तेव्हा सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी देशाच्या लोकसंख्या धोरणाचा पुनर्विचार होण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी शस्त्रपुजन करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ मोहन भागवत म्हणाले की, देशांचं लोकसंख्या धोरण असायला हवं या बद्दल दुमत नाही. याआधीही यावर सरकारनं विचार केलाय. पण आता लोकसंख्येचं वाढतं असंतुलन बघता सरकारने पुन्हा विचार करायला हवा.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, “देशाच्या सीमावर्ती जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात घुसखोरी होतेय. तिथल्या वाढत्या लोकसंख्येची सरासरी ही देशाच्या सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. हे बांगलादेशमधून घुसखोरी होत असल्याचं दर्शवते. त्यामुळे राष्ट्रीय नागरीकत्व नोंदणी चा उपयोग करून घुसखोरांना हाकलून लावा असे ते म्हणाले.

सरसंघचालक मोहन भागवत : भारताने गमावलेले अखंडत्व प्राप्त करायला हवे

देशाच्या फाळणीची वेदना अजूनही कोणी विसरू शकलेलं नाही. भारताने गमावलेले अखंडत्व प्राप्त करायला हवे. त्यासाठी आपला समाज भेदरहित आणि समताधिष्ठित असण्याची गरज आहे. हिंदू समाज विखुरलेला राहील यासाठी बराच प्रयत्न सुरू आहे. परस्परातील भेद मिटविण्यासाठी समाजाला जोडणाऱ्या भाषेची आज गरज आहे.

भारताचा इतिहास, परंपरेची खिल्ली उडवणं, भारतीयांच्या मनात या रुढीपरंपरांविषयी अविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या प्रकारे भारतीय मूल्यांवर हल्ले सुरू आहेत. भारतीय परंपरेवर व मूल्यांवर आक्रमण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही लोक एकत्रही आले आहेत.

तालीबानपासून सावध राहायला पाहिजे

जगात अचानक एक घटना घडली आणि तालिबान चा उदय झाला. रशीया तुर्कस्थान या देशांनी त्यावेळी समर्थन केलं. पाकिस्तान आणि चायना तर आजही तालिबानचं समर्थन करतात. त्यामुळे तालिबानपासून सावध राहायला हवं असं आवाहनही सरसंघचालकांची केलं. तालिबान कदाचित बदललं असेल, पण चीन आणि पाकिस्तान बदललंय का? असा सवाल डॉ मोहन भागवत यांनी केला.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर भाष्य

लहान मुले मोबाईलवर काय पाहत आहेत, ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काय दाखविले जात आहे, यावर विचार करण्याची गरज सरसंघचालकांची व्यक्त केली. ओटीटी प्लॅटफॉर्म, बिटकॉईन, अमली पदार्थांचे वाढलेला वापर यावर कुणाचेही नियंत्रण दिसून येत नाहीये. सर्व स्तरातील लोकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. याला सीमापार असलेले देश प्रोत्साहन देत आहेत असे सरसंघचालक म्हणाले. करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहिलं पाहिजे. ही लाट येणार नाही अशी आशा करूया. पण त्यासाठी तयार राहूया. संघानं त्यासाठी तयारी केली आहे असे ते म्हणाले.

समाजाला जोडणारी भाषा पाहिजे

देशात चांगल्या वाईट घटना घडत असतात, त्यावर प्रतिक्रिया देताना प्रत्येकाने समाज तोडणारी नव्हे तर समाज जोडणारी भाषा करायला हवी. प्रत्येकाने मनात असलेली भेदभावाची भावना बदलली पाहिजे. व्यवस्था चालवणाऱ्याच्या मनात भेदभाव नसेल तर खरा उद्देश सफल होतो असंही सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी म्हंटल आहे.

इतिहासात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळावी

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, “देशाचं स्वातंत्र्य हे त्याग आणि बलिदानामुळे मिळालं. इतिहासात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे. देशात अनेक गोष्टींवरुन भेदभाव केला जात आहे. देशातील दोन राज्यांमध्ये गोळीबार केला जात आहे. त्यामुळे कुठेतरी हरवत चाललेली अखंडता परत मिळवण्यासाठी आणि रत त्या दुश्मनीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मुलांनी इतिहास वाचला पाहिजे.”
सरसंघचालक मोहन भागवत पुढे म्हणाले की, “कोरोनाकाळात मुलांकडे मोबाईल आला. पण त्याचा वापर कशासाठी केला जातोय हे कोणीही पाहत नाही. देशातील तरुण ड्रग्जच्या प्रसाराला बळी पडतात. त्यांच्यामध्ये व्यसनाधीनता वाढतेय, नवीन तंत्रज्ञानाचा अयोग्य वापर केला जातोय. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणायला हवं.”

स्व चा विसर नका पडू देऊ

स्वत:च्या भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. स्वभाषा, स्वभूषा आणि इतरही गोष्टींचे जाणिवपूर्वक वापर केला पाहिजे. ‘स्व’चा विसर पडता कामा नये असंही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

Back to top button