नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकत पवार यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी आता सारवासारव केली आहे. पवार यांच्यासंदर्भात केलेले विधान हे काँग्रेस पक्षाचे नसून ते आपले वैयक्तिक असल्याचेही लांबा यांनी म्हटले आहे.
अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमलेली आहे. त्यानंतर आता संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) नियुक्तीची आवश्यकता नाही, असे शरद पवार यांनी एका खाजगी दूरचित्रवाणीशी बोलताना म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी 'भित्रे, स्वार्थी लोक स्वत:च्या हितासाठी हुकूमशाही सत्ताधीशांचे गुणगान गात आहेत. पण, राहुल गांधी एकटे जनतेसाठी लढाई लढत आहेत. ते भांडवलदार चोर आणि चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदाराशीही लढत आहेत' अशी टीका केली होती.
अलका लांबा यांनी केलेले वक्तव्य काँग्रेसचे अधिकृत वक्तव्य मानायचे काय? असा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला होता. यावर लांबा यांनी ते विचार काँग्रेसचे नसून आपले वैयक्तिक असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, लांबा यांनी शरद पवारांसंदर्भात केलेल्या टिप्पणीची राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा :