नवी दिल्ली, वृत्तसंस्था : हिंडेनबर्ग प्रकरणात संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) मागणी करण्याची आवश्यकता नाही. उलट सर्वोच्च न्यायालयाने बनवलेल्या समितीसमोर सत्य समोर येण्याची शक्यता अधिक आहे. मुळात ज्या हिंडेनबर्गचा हा अहवाल आहे, त्यांचे नाव कधी ऐकलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात एका उद्योग समूहाला टार्गेट केले जात असावे असे वाटते, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी घेतली आहे. विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेविरुद्ध पवारांनी हे मत मांडल्याने खळबळ उडाली आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी प्रथमच इतर विरोधी पक्षांच्या उलट भूमिका मांडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. हिंडेनबर्ग अहवाल, त्यावर विरोधकांची जेपीसीची मागणी याबाबत सविस्तर बोलताना पवार यांनी आपली शंका उपस्थित केली.
ते म्हणाले की, विरोधी पक्ष एका संस्थेच्या अहवालाला गरजेपेक्षा अधिक महत्त्व देत आहेत. या संस्थेची पार्श्वभूमी कोणाला माहिती नाही, त्यांचे नावही आम्ही ऐकले नाही. त्यामुळे असे वाटते की, एका उद्योग समूहाला टार्गेट केले जात आहे. आम्ही राजकारणात आलो तेव्हा सरकारवर टीका करण्यासाठी टाटा-बिर्ला यांचे नाव घेतले जायचे; पण नंतर कळले की, टाटांचे देशासाठी किती योगदान आहे.
आताच्या काळात टाटा-बिर्ला यांच्याऐवजी अदानी-अंबानी यांच्यावर टीका केली जाते. विजेच्या क्षेत्रात अदानी यांचे काम मोठे आहे. हिंडेनबर्ग प्रकरणात विरोधकांनी लावून धरलेल्या जेपीसीच्या मागणीबाबत वेगळी भूमिका मांडताना शरद पवार म्हणाले, जेेपीसी नेमून प्रश्न सुटणार नाही. संयुक्त संसदीय समिती अर्थात जेपीसीत सत्ताधारी पक्षाचेच बहुमत असते. त्यामुळे सत्य समोर येणारच नाही. या प्रकरणात एकट्या काँग्रेसची जबाबदारी नाही, असे स्पष्टपणे सांगत पवार म्हणाले की, जेपीसीची मागणी सर्वच विरोधी पक्षांनी केली आहे. पण या तिढ्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंकडून होताना दिसत नाहीत. एखाद्या दिवशी काही कारणाने संसदेचे कामकाज झाले नाही तर दुसर्या दिवशी कामकाज सुरळीत चालवणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
राष्ट्रवादीची भूमिका वेगळी असेल; मात्र 19 पक्षांचे एकमत
नवी दिल्ली : हिंडेनबर्ग प्रकरणी वेगळी भूमिका घेणार्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भूमिकेवर काँग्रेसने सावध प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीची भूमिका वेगळी असू शकते. पण पंतप्रधान आणि अदानी समूह यांच्या संबंधांबाबत 19 समविचारी पक्षांना पूर्ण खात्री आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीने राजकीय वादळ उठले असून अदानी प्रकरणावरील पवारांच्या भूमिकेमुळे विरोधकांमध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. या विषयावर काँग्रेसने अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. पक्षाचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका वेगळी असू शकते. पण पंतप्रधान मोदी आणि अदानी समूहातील संबंधांबाबत आम्हा 19 समविचारी पक्षांना खात्री झालेली आहे की, तो विषय पूर्ण सत्य आणि अतिशय गंभीर आहे. देशाची घटना आणि लोकशाही भाजपच्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी सुरू असलेल्या लढाईत राष्ट्रवादीसह 20 समविचारी पक्ष एकत्रित आहोत. हिंडेनबर्ग प्रकरणात जेपीसीच्या मागणीसाठी 19 समविचारी पक्ष भांडत राहणार असल्याचे सांगताना रमेश यांनी त्यातून राष्ट्रवादीला वगळले. पण राष्ट्रीय पातळीवर भाजपसोबत लढण्यात आम्ही 20 समविचारी पक्ष एकत्रितपणे आपली लढाई सुरूच ठेवू, असेही रमेश म्हणाले.