अदानी-हिंडेनबर्ग वाद; पुरावे द्या, कोणालाही सोडणार नाही : गृहमंत्री शहा | पुढारी

अदानी-हिंडेनबर्ग वाद; पुरावे द्या, कोणालाही सोडणार नाही : गृहमंत्री शहा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  सर्वोच्च न्यायालयाने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय चौकशी स्थापन केली आहे. याप्रकरणी नागरिकांनी आपल्याकडील पुरावे या समितीला सुपूर्द करावेत. तपासात काही चुकीचे आढळले, तर कुणालाही सोडले जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

अमित शहा एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात म्हणाले की, सर्वांनीच देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या समितीसह ‘सेबी’ही या प्रकरणाची चौकशी करत आहे. विरोधकांनी निराधार आरोप करू नयेत. कारण, ते चौकशीत टिकत नाहीत.

शहा यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, आणीबाणीनंतर राहुल यांच्या आजी इंदिरा गांधी इंग्लंड दौर्‍यावर गेल्या होत्या. त्यावेळी त्या विरोधी बाकावर होत्या. सरकार त्यांना तुरुंगात पाठवण्याची तयारी करत होते.
ते म्हणाले, इंग्लंडमध्ये त्यांना तुमचा देश कसे काम करत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर इंदिरा गांधी यांनी माझा देश चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या होत्या की, काही मुद्दे आहेत, पण मी त्यावर येथे भाष्य करू इच्छित नाही. मी येथे केवळ भारतीय आहे. त्यामुळे मी येथे देशाविषयी काहीच बोलणार नाही.

Back to top button