
पुढारी ऑनलाइन डेस्क : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी 'जमीनीच्या मोबदल्यात रेल्वेमध्ये नोकरी' घोटाळा प्रकरणी लालू यादव यांच्या अनेक नातेवाइकांच्या दिल्ली आणि बिहार येथील घरी आणि कथित जमिनींवर छापे टाकले. एएनआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. लालू प्रसाद यांची कन्या मीसा भारती यांच्या दिल्लीतील तसेच राजदचे नेते आणि बिहारमधील माजी आमदार अबू दोजाना यांच्या घरावर छापे टाकण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Land for job scam : एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी 2004 ते 2009 या काळात ते रेल्वेमंत्री असताना भारतीय रेल्वेत नोकरीच्या मोबदल्यात लाच म्हणून स्वस्तात भूखंड मिळवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. तपासासंदर्भात गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एजन्सीने जवळपास दोन डझन ठिकाणी शोधही घेतला होता.
तर आज शुक्रवारी दिल्ली, (Land for job scam) एनसीआर आणि बिहारमध्ये 15 हून अधिक ठिकाणी शोध घेण्यात येत आहे. ईडीच्या अनेक पथकांनी एकाच वेळी या ठिकाणांवर शोध घेतला. यामध्ये संशयितांची निवासस्थाने, कार्यालये आणि घोटाळ्यातील लाभार्थी यांचा समावेश होता.
लालू प्रसाद यांच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) प्रकरणाची दखल घेत अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल (ECIR) दाखल केल्यानंतर ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार हे शोध घेतले.
Land for job scam : सीबीआयच्या एका पथकाने लालू प्रसाद यांची 'जमीनीच्या बदल्यात नोकरी' प्रकरणी चौकशी केल्यानंतर काही दिवसांनी फेडरल एजन्सीने हा शोध घेतला, असे एएनआयने म्हटले आहे. सीबीआयने सोमवारी लालूप्रसाद यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची त्यांच्या पाटणा (बिहार) निवासस्थानी पाच तासांहून अधिक काळ चौकशी केली होती.
सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित तीन जणांना आतापर्यंत अटक केली आहे. यामध्ये भोला यादव, जे लालू प्रसाद रेल्वेमंत्री असताना त्यांच्या विशेष कर्तव्यावर कार्यरत होते. हृदयानंद चौधरी, रेल्वे कर्मचारी आणि घोटाळ्यातील कथित लाभार्थी; आणि धर्मेंद्र राय, आणखी एक कथित लाभार्थी आरोपी आहेत ज्यांना सीबीआयने अटक केली आहे.