दिल्ली सरकारमध्ये सौरभ भारद्वाज, आतिशी यांना मिळणार मंत्रिपदाची संधी | पुढारी

दिल्ली सरकारमध्ये सौरभ भारद्वाज, आतिशी यांना मिळणार मंत्रिपदाची संधी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील मद्य धोरणातील कथित घोटाळा प्रकरणात सीबीआयच्या अटकेत असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून तिहार कारागृहात असलेले मंत्री सत्येंद्र जैन यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्री पदावर नियुक्तीसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांच्या नावांची शिफारस नायब राज्यपाल व्ही.के.सक्सेना यांच्याकडे केली असल्याची माहिती समोर आली आहे. नवीन मंत्र्यांच्या नियुक्तीची फाईल केजरीवाल यांनी एलजींकडे पाठवली आहे.

सीबीआयच्या अटकेत असलेल्या सिसोदियांना सर्वोच्च न्यायालयाकडून कुठलाही दिलासा न मिळाल्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे त्यांचा राजीनामा पाठवला होता. जैन यांनी देखील त्यांचा राजीनामा पाठवल्यानंतर दोन्ही वरिष्ठ मंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला होता. आता नवीन नावांची शिफारस मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्यानंतर एजी या नावावर कधी शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्लीच्या शिक्षण धोरणातील एक महत्वाचा चेहरा अशी ओळख आ. आतिशी यांची आहे. शिक्षणाचे अनेक मॉडेल लागू करण्यात आतिशी यांची भूमिका महत्वाची होती. तर, पक्षाचे अभ्यासू व्यक्तिमत्व अशी भारद्वाज यांची ओळख आहे.

दरम्यान सिसोदियांकडे असलेल्या सर्व १८ विभागांचा कार्यभार परिवहन मंत्री कैलाश गहलोत आणि राजकुमार आनंद यांच्याकडे सोपवण्यात आला होता. जैन यांच्या अटकेनंतर त्यांच्या मंत्रिपदाचा कार्यभार देखील सिसोदीयाच सांभाळत होते. या मंत्र्यांनी राजीनामा दिला असला तरी पक्ष पूर्ण शक्तीनिशी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे भारद्वाज यांनी स्पष्ट केले होते.

हेही वाचा : 

Back to top button