पुढारी ऑनलाईन डेस्क : अतिक्रमण हटवताना आई-मुलीला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील कानपूर देहाट (Kanpur Dehat) जिल्ह्यातील मैथा तहसीलच्या मदौली गावात घडला. याप्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर प्रसाद, लेखपाल अशोक सिंग, दिनेश गौतम, जेसीबी चालक दीपक याच्यासह २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर जेसीबी चालक दीपक याला अटक केली आहे. लेखपाल अशोक सिंग याला निलंबित केले आहे.
या घटनेत (Kanpur Dehat) मृत आई प्रमिला आणि मुलीच्या मृत्यूसोबत पती कृष्ण गोपाल दीक्षित हे गंभीर भाजले आहेत. दरम्यान, आयुक्त राज शेखर यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कानपूर देहाट येथे सरकारी जमिनीवरील बेकायदा अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन पोहोचले होते. मात्र, हे घर पाडण्यास पीडित कुटुंबाने विरोध केला असता त्यांना घर पेटवून देण्याची धमकी देण्यात आली.
या प्रकरणी एसडीएम ज्ञानेश्वर प्रसाद, रुरा पोलीस स्टेशनचे प्रभारी दिनेश कुमार, गौतम समीर, लेखपाल अशोक सिंह यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. अतिक्रमण पाडल्यानंतर अधिकार्यांनी कट रचून कृष्ण गोपाल दीक्षित यांच्या कुटुंबीयांना बळजबरीने झोपडीत डांबून ती पेटवून दिली, असा पीडित कुटुंबाचा आरोप आहे. त्यामुळे झोपडीत अडकलेल्या आई-मुलीचा आगीत जळून मृत्यू झाला. यानंतर कानपूर देहाटच्या मंडोली गावात ग्रामस्थ आणि कुटुंबियांनी पोलीस आणि प्रशासनावर हल्लाबोल केला.
दरम्यान, पीडित कृष्ण कुमार दीक्षित यांनी सांगितले की, या जमिनीवर त्यांच्या कुटुंबाचा बराच काळ ताबा आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला विरोध केला. परंतु अधिकाऱ्यांच्या संगनमताने झोपडी पेटवून देण्यात आली. यात मुलगी व पत्नीचा आगीत होरपळून मृत्यू झाला. अतिक्रमण काढण्यासाठी गावातील काही जणांचा प्रशासनाला फूस होती,असा आरोपही कृष्ण कुमार दीक्षित यांनी केला आहे.
हेही वाचा