पुढारी ऑनलाईन: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी पहाटे झालेल्या शक्तिशाली भूकंपाने संपूर्ण जग हादरले आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीत तुर्कीसह सीरियात मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्त हानी झाली आहे. जगभरातील अनेक देश तुर्कीच्या मदतीला धावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तातडीची बैठक घेत तुर्कीला मदतीचा हात पुढे केला. भारताची पहिली मदत तुकडी आज तुर्कस्तानला रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
भारतातून NDRF ची शोध आणि बचाव पथक, विशेष प्रशिक्षित श्वान पथके, वैद्यकीय पुरवठा आणि इतर आवश्यक उपकरणांसह भूकंप मदत सामग्री तुर्कीला रवाना झाली आहे, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
भूकंपानंतरच्या परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदी यांनी बैठक घेतली. या वेळी १०० सदस्यीय 'एनडीआरएफ'चे पथक आणि वैद्यकीय मदत साहित्य तुर्कस्तानला पाठवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांनुसार आज पहिली तुकडी तुर्कीत दाखल झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीडितांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. त्यांनी म्हटले होते की, "तुर्कस्तानमधील भूकंपामुळे झालेल्या मृत्यू आणि मालमत्तेच्या हानीमुळे दुःखी झालो आहे. शोकाकुल कुटुंबियांचे दु:ख मी समजू शकतो. त्यांच्यासाठी हा कठीण काळ आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. भारत तुर्कस्तानच्या नागरिकांसोबत एकजुटीने उभा आहे. या दुर्घटनेला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही तयार आहोत."