9 लाख सरकारी वाहने 1 एप्रिलपासून होणार स्क्रॅप : नितीन गडकरी | पुढारी

9 लाख सरकारी वाहने 1 एप्रिलपासून होणार स्क्रॅप : नितीन गडकरी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्र तसेच राज्य सरकारांच्या अखत्यारितील 15 वर्षे उलटून गेलेल्या सुमारे 9 लाख जुन्या गाड्या तसेच बसेस येत्या 1 एप्रिलपासून रस्त्यांवर धावणार नाहीत, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी सोमवारी फिक्की संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना दिली.

केंद्र व राज्य सरकारांच्या अखत्यारितील 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्या रस्त्यावरून हद्दपार करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने घेतला होता. त्यानुसार अशा सुमारे 9 लाख गाड्या 1 एप्रिलपासून हद्दपार होणार असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. सरकारांच्या अखत्यारितील गाड्यांबरोबरच राज्य परिवहन मंडळ आणि सार्वजनिक कंपन्यांच्या मालकीच्या पंधरा वर्षांपेक्षा जुन्या गाड्या हद्दपार होणार असल्याचे गडकरी (nitin gadkari) यांनी सांगितले.

इथेनॉल, मिथेनॉल, जैव सीएनजी, जैव एलएनजी तसेच इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण असल्याचे सांगून गडकरी पुढे म्हणाले की, सरकारच्या अखत्यारितील गाड्या हद्दपार केल्यानंतर त्यांची जागा ज्या नव्या गाड्या घेतील, त्या पर्यायी इंधनावर धावणाऱ्या असतील. सोलार उर्जा देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. अशा स्थितीत इलेक्ट्रीक वाहनांत सोलार उर्जेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो. लांब पल्ल्यावर धावणाऱ्या ट्रकसाठी एलएनजी हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. एकदा एलएनजी टाकी भरली की 1400 किलोमीटर धावेल, अशा एलएनजी ट्रकचे उद्घाटन अलिकडेच मी केलेले आहे.

Back to top button