राष्‍ट्रपती भवनमधील मुघल गार्डनचे नाव बदलले, आता अमृत उद्यान अशी नवी ओळख | पुढारी

राष्‍ट्रपती भवनमधील मुघल गार्डनचे नाव बदलले, आता अमृत उद्यान अशी नवी ओळख

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्ट्रपती भवनमधील मुघल गार्डनचे नाव बदलण्‍यात आले आहे. आता हे गार्डन अमृत उद्यान म्हणून ओळखले जाणार आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारताच्या राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनाच्या उद्यानांना ‘अमृत उद्यान’ असे  नाव दिले आहे, अशी माहिती राष्‍ट्रपती भवनमधील माध्‍यम उपसचिव नाविका गुप्ता यांनी आज ( दि. २८) दिली.

ट्यूलिप आणि गुलाबाच्या विविध प्रजातींची फुले पाहण्यासाठी लोक येथे येतात. राष्ट्रपती भवनात असलेले गार्डन हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्‍य केंद्र  आहे. हे गार्डन यंदाही ३१ जानेवारीपासून खुले होणार आहे. या गार्डनमध्‍ये ब्रिटीश आणि मुघल दोन्ही उद्यानांची झलक पाहायला मिळते.  एडविन लुटियन्सने प्रथम देशातील आणि जगातील विविध उद्यानांचा अभ्यास केला. यानंतर या गार्डनमध्‍ये रोपे लावण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागला होता. आज जगातील प्रसिद्ध उद्यानांमध्‍ये याचा समावेश होतो.

केंद्र सरकार वेळोवेळी अनेक ठिकाणांची नावे बदलत असते. मागील काही वर्षांमध्‍ये अनेक इमारती, संस्था आणि रस्त्यांची नावे बदलण्यात आली आहेत. औरंगजेब रोडचे अब्दुल कलाम रोड, नियोजन आयोगाचे नीती आयोग, रेसकोर्स रोडचे लोककल्याण मार्ग आणि फिरोजशाह कोटला स्टेडियमचे अरुण जेटली स्टेडियम असे नामकरण करण्यात आले आहे.

 

 

 

Back to top button