जन्मदात्या आई-वडिलांचा खून करणाऱ्या नराधमाला फाशी | पुढारी

जन्मदात्या आई-वडिलांचा खून करणाऱ्या नराधमाला फाशी

दुर्ग, वृत्तसंस्था : जन्मदात्या आई- वडिलांचा खून केल्याबद्दल एका नराधमाला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते रावळमल जैन (७२) आणि त्यांच्या पत्नी सुर्जी देवी (६७) यांचा संदीप जैन (४७, मुलगा) याने घरातच गोळ्या झाडून खून केला होता. १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या या घटनेने देशभरात खळबळ उडविली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेशकुमार तिवारी यांनी दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा ठरवून आरोपी संदीप जैनला फाशीची शिक्षा सुनावली.

आपल्या ३१० पानांच्या निकालपत्रात न्यायाधीशांनी महाभारतातील काही दाखलेही दिले. संदीपला पिस्टल पुरविणाऱ्या भगतसिंग गुरुदत्त आणि शैलेंद्र सागर यांना पाच वर्षे सक्तमजुरीची आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, असे सरकारी वकील सुरेशप्रसाद शर्मा यांनी सांगितले. घटनेच्या दिवशी घरात आई-वडील आणि मुलगा हे तिघेच होते. पोलिसांनी संदीपनेच आई-वडिलांचा खून केला, असे दोषारोपपत्र दाखल केले होते. आई-वडील आणि मुलामध्ये संपत्तीवरून वाद होते. पूजेसाठी वडील संदीपला नदीतून पाणी आणायला सांगत, हेही संदीपला आवडत नव्हते, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

Back to top button