‘लुडो’वर फुललेल्या प्रेमाने ओलांडली भारत-पाक सीमा | पुढारी

‘लुडो’वर फुललेल्या प्रेमाने ओलांडली भारत-पाक सीमा

बंगळूर; वृत्तसंस्था :  ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप लुडो खेळत असताना पाकिस्तानमधील इकरा जीवनी (19) ही युवती सध्या बंगळूर येथे वास्तव्यास असलेल्या मूळ यूपीतील मुलायमसिंह यादव (26) या तरुणाच्या प्रेमात पडली. तिच्या प्रेमाने पुढे थेट बेकायदा सीमा ओलांडली. नेपाळमार्गे ती भारतात आली आणि आणखी पुढे बनावट कागपत्रे तयार करून मुलायम व इकराने लग्नही केले. दोघे एकत्र राहू लागले. बनावट कागदपत्रे तयार करणे, भारतात अवैध पद्धतीने राहणे आदी गुन्ह्यांत इकरासह या एकूण प्रकरणात तिला साथ देणार्‍या मुलायमविरुद्धही कडक कारवाई पोलिसांनी केली आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे.

मुलायम हा बंगळूर येथे एचएसआर लेआऊट या खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक आहे. इकराही सप्टेंबर 2022 मध्ये नेपाळमधील काठमांडूमार्गे भारतात आली. नंतर मुलायमसह बंगळूरच्या बेलंदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लेबर क्वार्टरमध्ये राहू लागली. मात्र, हे गुपित फार काळ लपून राहू शकले नाही. पोलिसांना माहिती मिळताच दोघांनाही अटक झाली. पाकिस्तानी मुलीला फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसच्या ताब्यात दिले आहे.

Back to top button