महिलांना मासिक 2 हजार मदत : प्रियांका गांधी | पुढारी

महिलांना मासिक 2 हजार मदत : प्रियांका गांधी

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट मोफत विजेच्या घोषणेनंतर आता प्रदेश काँग्रेसने कुटुंबप्रमुख महिलेला मासिक 2 हजार रुपये देण्याची ‘गृहलक्ष्मी’ योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. येथील अरमने मैदानावर सोमवारी आयोजित ‘मी नेता’ या महिला मेळाव्यात राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी-वधेरा यांनी ही घोषणा केली.

विद्यमान भाजप सरकारचा कार्यकाळ चारच महिने उरला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसने डावपेच आखले आहेत. त्यासाठी जोरदार तयारीही सुरू केली आहे. प्रदेश काँग्रेसने ‘प्रजाध्वनी’ यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा बेळगावातून सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी 200 युनिट मोफत विजेचे आश्वासन देण्यात आले. एकूण पाच मोठ्या घोषणा करण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. त्यानुसार महिला मेळाव्यात प्रियांका गांधींनी दुसरी मोठी घोषणा केली.

त्या म्हणाल्या, आज महागाई प्रचंड वाढली आहे. एकाच पगारात घरखर्च चालवणे अशक्य बनले आहे. अशावेळी कुटुंबप्रमुख महिलेला कुटुंबाचे पोट भरणे कठीण बनते. त्यामुळे गृहलक्ष्मी योजना आखली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास प्रत्येक कुटुंबप्रमुख गृहिणीला मासिक 2 हजार रुपये देण्यात येतील. यापुढे प्रत्येक घराची जबाबदारी काँग्रेसची असेल. जीवनावश्यक वस्तूंचे दर भडकले तरी काळजी करायचे कारण नाही. काँग्रेसच्या योजनेतून हा खर्च करता येईल.

देशामध्ये 50 टक्के महिला आहेत. सर्व शहर आणि ग्रामीण भागात महिलांनी सशक्त बनावे. राजकीय पक्षांकडून सर्व जाती, जमातींना मतदानाचे आवाहन केले जात आहे. पण, एकाही पक्षाने महिलांबाबत विचार केलेला नाही. लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. याद्वारे सरकारला इशारा देण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकातील भाजप सरकार विकासकामांमध्ये 40 टक्के कमिशन घेत आहे. पोलिस उपनिरीक्षक भरती परीक्षा घोटाळा लाजिरवाणा आहे. या सरकारने पोलिस पथके विकण्यास काढली आहेत. तीन वर्षांच्या सत्ता काळात या सरकारने दीड लाख कोटींची लूट केल्याचा आरोप प्रियांका गांधींनी केला.

भावनिक आवाहन

आपली आई सोनिया गांधी यांनी वयाच्या 44 व्या वर्षी पती गमावला. देशासाठी त्यांनी केलेला त्याग मोठा आहे. आतापर्यंत अनेक कष्ट आले. पण, त्या देशासाठी ठामपणे उभ्या आहेत. महिलांनी आपल्या भविष्याचा विचार करावा. आपल्या पायावर उभे रहावे. शिक्षण, रोजगार, मुलांचे उत्तम भविष्य प्रत्येकाला हवे आहे. त्यासाठी आता बदल घडवून आणण्याची वेळ आली आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

Back to top button