नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सोमवारी आणि मंगळवारी राजधानी दिल्लीत होणार असून या बैठकीत चालूवर्षी होणार्या नऊ राज्यांच्या विधानसभा तसेच पुढील वर्षीच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर मंथन होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत नड्डा यांना मुदतवाढ दिली जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी भाजप नेते तसेच कार्यकर्त्यांना निवडणुका जिंकण्याचा मंत्र देतील. जी – 20 देशांच्या समूहाचे अध्यक्षपद सध्या भारताकडे आहे. यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, याकरिता पंतप्रधान नेते व कार्यकर्त्यांना आवाहन करण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता पक्षाच्या मुख्यालयात जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचा अजेंडा निश्चित केला जाईल.