Ethanol : वर्षाअखेर इथेनॉल निर्मिती क्षमता १२५० कोटी लिटर्सवर जाणार | पुढारी

Ethanol : वर्षाअखेर इथेनॉल निर्मिती क्षमता १२५० कोटी लिटर्सवर जाणार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : चालू वर्षाच्या अखेरपर्यंत देशाची इथेनॉल (Ethanol) निर्मिती क्षमता 25 टक्क्याने वाढून 1250 कोटी लिटर्सवर जाईल, असा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. पारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून सरकारने इथेनॉलचा वापर वाढविण्याचा निर्धार केलेला आहे. यासाठी जास्तीत जास्त इथेनॉल प्रकल्प स्थापन व्हावेत, असा सरकारचा प्रयत्न आहे.

इथेनॉल (Ethanol) निर्मिती प्रकल्पांसाठी व्याजदरातील सवलतीची योजना राबविली जात आहे. शिवाय पर्यावरणविषयक परवाने वेळेवर दिले जात आहेत. एक खिडकी योजनेद्वारे प्रकल्प मार्गी लावले जात असल्याने देशातील इथेनॉल निर्मिती क्षमता झपाट्याने वाढत आहे. मागील काही काळात इथेनॉल निर्मिती प्रकल्पांसाठी 20 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले असून यातील सुमारे दहा हजार कोटी रुपये प्रत्यक्षात वितरित करण्यात आले असल्याचे खाद्यान्न मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. जवळपास 225 नवे प्रकल्प आगामी काळात कार्यान्वित होणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

मागील दोन वर्षांच्या कालावधीत पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाची क्षमता दुपटीने वाढवून दहा टक्क्यांपर्यंत नेण्यात आली आहे. चालू वर्षी हे प्रमाण बारा टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. तर वर्ष 2025 पर्यंत हेच प्रमाण 25 टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. चालूवर्षी म्हणजे 2023 च्या अखेरपर्यंत एकूण इथेनॉल क्षमता 1250 कोटी लिटरवर जाण्याचा अंदाज आहे. एकूण उत्पादनापैकी उसापासून इथेनॉल बनविले जाण्याचे प्रमाण 70 टक्के इतके असून इतर धान्यांपासून इथेनॉल बनविले जाण्याचे प्रमाण 30 टक्के इतके आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button