गृहमंत्री अमित शहा आज राजौरी दौर्‍यावर | पुढारी

गृहमंत्री अमित शहा आज राजौरी दौर्‍यावर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  सलगच्या दहशतवादी घटनांमुळे हादरलेल्या जम्मू-काश्मीरमधील राजौरीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी (दि.13)भेट देणार आहेत. दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष्य करीत याठिकाणी बॉम्बहल्ले तसेच गोळीबार केला होता. या हल्ल्यात सातजण मृत्युमुखी पडले होते. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. दहशतवाद्यांनी ज्या घरांवर हल्ला केला होता, त्याठिकाणी गृहमंत्री जाणार आहेत.  मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन ते दिलासा देणार असल्याचे गृह मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

या भेटीनंतर शहा जम्मू येथील राजभवनमध्ये काही शिष्टमंडळांची भेट घेतील. गेल्या 2 जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी राजौरी जिल्ह्यातील डांगरी विभागात हिंदू लोकांच्या घरांना लक्ष्य केले होते. यावेळी गोळीबार करून दहशतवाद्यांनी पाच लोकांचा बळी घेतला होता. याच्या दुसर्‍या दिवशी दहशतवाद्यांनी पेरलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन दोन लहान मुलांचा मृत्यू झाला होता. दोन्ही हल्ल्यांत बारा लोक जखमी झाले होते.

Back to top button