मृतदेह, रक्त, शारीरिक हल्ल्याचे फुटेज, छायाचित्रे दाखवू नका, केंद्राची टीव्ही चॅनेल्सना सूचना | पुढारी

मृतदेह, रक्त, शारीरिक हल्ल्याचे फुटेज, छायाचित्रे दाखवू नका, केंद्राची टीव्ही चॅनेल्सना सूचना

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोमवारी सर्व दूरदर्शन वाहिन्यांना एक परिपत्रक जारी केले आहे. संवदेनशील, आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसारित करू नका, अशा सूचना सरकारने टीव्ही चॅनेल्सना दिल्या आहेत. कार्यक्रम संहितेनुसार रक्त, मृतदेह आणि शारीरिक हल्ल्याचे फोटो प्रसारित करू नये. दूरचित्रवाणी वाहिन्यांकडून अशी अनेक प्रकरणे निदर्शनास आल्यानंतर मंत्रालयाने ही सूचना जारी केली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे की, सोशल मीडियावरून घेतलेले हिंसक व्हिडिओ दूरचित्रवाणी वाहिन्यांद्वारे कोणतेही संपादन न करता प्रसिद्ध केले जात आहेत. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर मृतदेह आणि रक्त, हिंसाचार, अपघात, जखमी व्यक्तींचे फुटेज आणि छायाचित्रे दाखवली जातात. यामुळे महिला आणि मुलांवर वाईट परिणाम होत आहे.

मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, रक्त, मृतदेह आणि शारीरिक हल्ल्याची छायाचित्रे टीव्ही चॅनेलच्या प्रोग्राम कोडच्या विरोधात आहेत. अशा हिंसक आणि त्रासदायक बातम्यांचा मुलांच्या मानसशास्त्रावर विपरीत परिणाम होत असल्याचे अॅडव्हायझरीत म्हटले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button