तामिळनाडूतील प्राचीन मंदिर अनुसूचित जातींसाठी खुले ! | पुढारी

तामिळनाडूतील प्राचीन मंदिर अनुसूचित जातींसाठी खुले !

चेन्नई, वृत्तसंस्था : तामिळनाडूतील कल्लाकुरुची जिल्ह्यातील एका प्राचीन मंदिरात अनुसूचित जातींच्या पोलिस अधिकाऱ्यांसह ४०० भाविकांनी वैकुंठ एकादशीच्या मुहूर्तावर, सोमवारी प्रवेश केला.

इदुथवैनाथम गावातील अनुसूचित जातीच्या प्रतिनिधींनी वरदराज पेरुमल मंदिरात प्रवेश करून मोठे दानही दिले. मंदिरासमोर रांगा लावलेल्या या बांधवांच्या हातात फळांच्या परड्या, रेशमी वस्त्रे आणि पुष्पहारांसह देवाला अर्पण करण्यासाठी आणलेल्या अनेक वस्तू होत्या. या मंदिराच्या वार्षिकोत्सवानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या उत्सवांमध्ये पूर्वी अनुसूचित जातींचे भाविक सहभागी होत असत, परंतु २००८ मध्ये गावात वाद झाल्यामुळे त्यावरही बंदी घालण्यात आली होती. हे मंदिर खासगी असावे, असा समज झाल्याने कोणी या बंदीला विरोधही केला नव्हता. वास्तविक, हे मंदिर तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि धर्मादाय संस्था विभागाच्या मालकीचे आहे. ही बाब अलीकडेच अनुसूचित जातींच्या सदस्यांना समजली. त्यामुळे त्यांनी हा भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी आंदोलन करण्याचे ठरविले.

प्रशासनाचा पुढाकार

अनुसूचित जातीच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मंदिर प्रवेशाची परवानगी मागितली. त्यांच्या अर्जावर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत गावात बैठकीचे आयोजन केले. दलितांच्या मंदिर प्रवेशावर बंदी घालता येणार नाही, असे प्रशासनाने इतर समाजांच्या प्रतिनिधींना सांगितले. सर्वांनी ते मान्य केले आणि मंदिर सर्वांसाठी खुले असल्याचे जाहीर केले. त्यामुळे हे मंदिर २०० वर्षांनी सर्वांसाठी खुले झाले.

Back to top button