माझा भाऊ योद्धा; त्याचा अभिमान : प्रियांका गांधी-वधेरा | पुढारी

माझा भाऊ योद्धा; त्याचा अभिमान : प्रियांका गांधी-वधेरा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : माझा भाऊ योद्धा आहे. अदानी आणि अंबानी यांनी नेत्यांना खरेदी केले आहे, पण ते माझा भाऊ राहुल गांधी यांना खरेदी करू शकले नाहीत कधीच खरेदी करू शकणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा यांनी केले. मंगळवारी भारत-जोडो यात्रा उत्तर प्रदेशमध्ये पोहोचली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

राहुल गांधी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत मला त्यांचा गर्व असल्याचे यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या. त्या म्हणाल्या सत्तेतील भाजप सरकारने राहुल गांधी यांची प्रतिमा खराब करण्यासाठी हजारो कोटींचा खर्च केला; मात्र ते सत्यापासून कधीच बाजूला हटले नाहीत. राहुल गांधी यांच्यामागे तपास यंत्रणांना लावल्या पण ते कधीच घाबरले नाहीत. दरम्यान मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दिल्लीच्या काश्मीरी गेटनजीकच्या जमुना बाजारातून यात्रा रवाना झाली. दुपारी यात्रा उत्तर प्रदेशातील लोणी (गाझियाबाद) येथे पोहोचली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींसह अन्य नेत्यांचे जोरदार स्वागत केले.

उत्तर प्रदेशात जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी दिल्लीतील मार्गघाटातील हनुमानजींचे दर्शन घेतले. यावेळी पुजार्‍याने त्यांना गदाही दिली. राहुल गांधी तीन दिवसांत उत्तर प्रदेशात 130 किलोमीटर पायी चालणार आहेत.

त्याने सत्याचे चिलखत घातलेय

प्रियांका म्हणाल्या की, मला कोणीतरी विचारले होते की, तुझ्या भावाला थंडी वाजत नाही का? तुम्ही घाबरत नाही का? त्याच्या सुरक्षेसाठी काय केले. माझा भाऊ चिलखत घालून चालत आहे. देव त्याला सुरक्षित ठेवील. सगळे मिळून जाऊया. एकता, शक्यता, प्रेमाचा संदेश घेऊन जा. यानंतर दोघांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या.

Back to top button