अयोध्येत रामलल्लांसाठी सोन्याचे सिंहासन | पुढारी

अयोध्येत रामलल्लांसाठी सोन्याचे सिंहासन

अयोध्या : मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचे भव्यदिव्य मंदिर अयोध्येत उभारले जात आहे. पहिल्या टप्प्यातील काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. गर्भगृहाचाही त्यात समावेश आहे. जानेवारी 2024 मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी याच गर्भगृहात रामलल्ला सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होतील. गर्भगृहासाठी कर्नाटकमधून मागविण्यात आलेले ग्रेनाईट वापरले जात आहे. दारासाठीचे साग महाराष्ट्रातून येणार आहे. मूर्तीसाठीचे संगमरवर राजस्थानातून दाखल झाले आहे. राम मंदिरासह राम पथ, भक्ती पथ, रेल्वेस्थानक, विमानतळासह 50 हून अधिक प्रकल्पांचे कामही अयोध्येत सुरू आहे.

सोन्याचे शिखर महाराष्ट्रातून?

मंदिराचे शिखरही सोन्याचे असेल, असे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्रातील एका व्यावसायिकाने जन्मभूमी ट्रस्टकडे स्वखर्चाने ते उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. अद्याप ट्रस्टने त्यावर निर्णय दिलेला नाही.

डिसेंबर 2023 पर्यंत मंदिराचा तळमजला तयार झालेला असेल. त्यात गर्भगृहासह गुडी मंडप, नृत्य मंडप, रंग मंडप, कीर्तन मंडप अशी दालने असतील.

– डॉ. अनिल मिश्र, सदस्य, श्री राम जन्मभूमी ट्रस्ट, अयोध्या

Back to top button