Amit Shah : अंमली पदार्थ देशासाठी गंभीर समस्या : अमित शहा | पुढारी

Amit Shah : अंमली पदार्थ देशासाठी गंभीर समस्या : अमित शहा

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : अंमली पदार्थ देशासाठी एक गंभीर समस्या आहे. परंतु, मोदी सरकारने ‘ड्रग्स’ विरोधात कठोर धोरण अवलंबले आहे. या मुद्यावर कुठलेही राजकारण करू नये, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज (दि.२१) लोकसभेत अंमली पदार्थांच्या मुद्यावरील चर्चेला उत्तर देताना केले. अंमली पदार्थांसंदर्भात केंद्र सरकारने शून्य सहिष्णुतेचे धोरण स्वीकारले आहे. देशाला व्यसनमुक्त करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे. सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांनी त्यामुळे एकत्रित येवून अंमली पदार्थांविरोधात लढा द्यावा लागेल. देशात सीमेवर, बंदरांवर तसेच विमानतळावरुन होणाऱ्या ड्रग्सच्या प्रवेशाला रोखण्याची आवश्यकता आहे. महसूल विभाग, एनसीबी तसेच अंमली पदार्थ विरोधी एजन्सींना सामूहिक प्रयत्नांनी अंमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात लढावे लागेल, असे शहा म्हणाले.

भारतात दहशतवादाला खतपाणी घालणारा देश अंमली पदार्थांमुळे होणाऱ्या फायदाचा वापर दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी करीत असल्याचा दावा पाकिस्तानचे नाव न घेता शहा यांनी केला. या पैशांमुळे हळूहळू देशाची अर्थव्यवस्था देखील खिळखिळी होत असल्याचे देखील गृहमंत्री म्हणाले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) संपूर्ण देशात तपास करू शकते. आंतरराज्यीय तपासाची आवश्यकता असल्यास एनसीबी प्रत्येक राज्याला मदत करण्यासाठी तयार आहे, असे आश्वासन शहा यांनी सभागृहात दिले. देशाच्या बाहेर तपासाची आवश्यकता असल्यास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) देखील राज्यांना मदत करु शकेल, असे देखील गृहमंत्री (Amit Shah) म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी शहा यांच्याकडून देण्यात आलेल्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारताला ‘ड्रग्स मुक्त’ करण्याचा केंद्राचा मानस जमीन पातळीवर दिसून येत नाही. २०१८ मध्ये ड्रग्समुळे ७ हजार १९३ आत्महत्या झाल्या. तर, २०२१ मध्ये ड्रग्समुळे १० हजार ५६० मृत्यू झाले. ही आकडेवारी वाढतच आहे, असे चौधरी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

Amit Shah : आदित्य उद्धव ठाकरेंची चौकशी करा – राहुल शेवाळे

अभिनेता सुशांत सिंह राजपुत तसेच त्याची मॅनेजर दिशा सालीयान यांच्या आत्महत्या प्रकरणात अदित्य उद्धव ठाकरे यांची चौकशी करण्याची मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. तीन पातळीवर झालेल्या या तपासात काही इलेक्ट्रानिक पुरव्यांमध्ये बिहार पोलिसांना ‘एयू’ नावाचा उल्लेख आढळला. हा उल्लेख आदित्य उद्धव असा असल्याचा दावा करीत शेवाळे यांनी या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार २००९ च्या तुलनेत २०२२ मध्ये भारतात ड्रग्स घेणाऱ्यांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली. २०१९ मध्ये मद्यपान करणाऱ्यांची संख्या १६ कोटी होती. एनसीआरबीच्या अहवालानुसार देशात दररोज २१ लोकांचा ड्रग्समुळे मृत्यू होतोय, असे शेवाळेंनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button