काबूलवर तालिबान आल्यापासून पाकमधील हल्ल्यांत 51 टक्के वाढ | पुढारी

काबूलवर तालिबान आल्यापासून पाकमधील हल्ल्यांत 51 टक्के वाढ

इस्लामाबाद/काबूल; वृत्तसंस्था :  अफगाणिस्तानात तालिबान सरकार स्थापन व्हावे म्हणून पाकिस्तानने विशेष प्रयत्न केले. तालिबान सरकारशी लढत असलेल्या रेझिस्टन्स फोर्सचा पाडाव व्हावा म्हणून लष्करी मदतही तालिबानला पुरवली आणि तालिबान सरकार एकदाचे स्थापन झाले. पुढे सीमेवरून दोन्ही देशांत कुरबुरी सुरू झाल्या. पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाणही वाढले.

तालिबानचा पाठबळ या हल्ल्यांना असल्याचे मानले जाते. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ही पाकिस्तानातील दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्येही संपूर्ण शरियत लागू व्हावी, या मताची आहे. माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येतही या संघटनेचा हात असल्याचे सांगण्यात येते. इंटरनॅशनल फोरम फॉर राईटस्नुसार 2006 पासून ते आतापर्यंत 83 हजार पाकिस्तान्यांचा खून या संघटनेने केला आहे. काबूलमध्ये तालिबान सरकार आल्यापासून पाकमधील दहशतवादी हल्ल्यांत 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार सध्या अफगाणिस्तानात टीटीपीचे 5 हजार ते 6 हजार 500 दहशतवादी आश्रयाला आहेत.

टीटीपीची दहशतवादी कृत्ये

  • 2007 : बेनझीर भुट्टो यांची हत्या टीटीपीनेच घडवून आणल्याचा निष्कर्ष पाकिस्तानी तपास यंत्रणांनी काढला होता.
  •  2008 : राजधानी इस्लामाबादेतील मॅरियट हॉटेलात गोळीबार, बॉम्बस्फोट; डेरा इस्माईल खानवर हल्ला, 32 जणांचा मृत्यू.
  •  2009 : पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय व अन्य कार्यालयांवर हल्ले.
  •  2012 : नोबेल विजेती मलाला युसूफझाई हिच्या डोक्यात गोळी घातली.
  •  2014 : पेशावर लष्करी विद्यालयात गोळ्या झाडून 131 मुलांसह 150 जणांची हत्या.

Back to top button