गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात सरासरी 60 टक्के मतदान | पुढारी

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात सरासरी 60 टक्के मतदान

गांधीनगर; वृत्तसंस्था : गुजरात विधानसभेच्या 89 जागांसाठी गुरुवारी शांततेत मतदान पार पडले. प्राथमिक आकडेवारीनुसार 60.20 टक्के मतदान नोंदले गेले आहे. 183 जागा असलेल्या गुजरात विधानसभेच्या दोन टप्प्यांत निवडणुका होत आहेत. गुरुवारी पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी मतदान झाले.

सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील 19 जिल्ह्यांतील हे मतदारसंघ आहेत. आज झालेल्या मतदानात सुरत, पोरबंदर, खंबालिया, राजकोट, जामनगर उत्तर, मोरबी या प्रमुख मतदारसंघांचाही समावेश आहे. येथील लढती प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत.  मतदानाचा दुसरा टप्पा 5 डिसेंबर रोजी पार पडणार असून त्यात 93 जागांवर मतदान होणार आहे.

आज सकाळी 8 वाजता मतदानाला प्रारंभ झाला. सुरुवात धिम्या गतीने झाली. मध्यान्हीपर्यंत मतदानाने बर्‍यापैकी वेग घेतला होता. सायंकाळी मात्र मतदानाला वेग आला. निरीक्षकांच्या मते गेल्या वेळपेक्षा यंदा मतदान काहीसे कमी झाले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण 48.48 टक्के मतदान झाले. त्या वेळेपर्यंत सर्वाधिक 72.32 टक्के मतदान तापी येथे झाले सर्वात कमी 42.26 टक्के मतदान जामनगर जिल्ह्यात झाले. इतर भागांपेक्षा दक्षिण गुजरातमध्ये मतदानाचा उत्साह अधिक दिसून आला. नर्मदा येथे 68.09 टक्के आणि डांग जिल्ह्यात 64.24 टक्के मतदान झाले.

Back to top button