मर्सिडिजने कमी खपाचे खापर फोडले म्युचअल फंडवर; 'SIPमुळे भारतात लक्झरी कारचा खप कमी' | पुढारी

मर्सिडिजने कमी खपाचे खापर फोडले म्युचअल फंडवर; 'SIPमुळे भारतात लक्झरी कारचा खप कमी'

मार्केटिंग प्रमुख संतोष अय्यर यांचे मत

पुढारी ऑनलाईन : भारतात म्युचअल फंडातील गुंतवणूक ही आमची मुख्य स्पर्धक आहे, असे मत मर्सिडिज कंपनीने व्यक्त केले आहे. लोक सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (SIP)च्या माध्यमातून गुंतवणूक करत आहेत, त्यामुळे ते लक्जरी कार घेत नाहीत, असे वक्तव्य मर्सिडिज बेंझ इंडियाचे सेल्स आणि मार्केटिंग प्रमुख संतोष अय्यर यांनी केले आहे. (Mercedes Benz India on SIP)

ज्यांच्याकडे खर्च करण्यासारखे जादा उत्पन्न आहे, असे लोकही लक्झरीवर खर्च करत नाहीत, त्यांनी SIP हा गुंतवणुकीचा योग्य पर्याय वाटतो, असे ते म्हणाले. अय्यर यांची ही मुलाखत टाइम्स ऑफ इंडियात प्रसिद्ध झाली आहे. “एखाद्या ग्राहकाने SIPमध्ये गुंतवले जाणारे ५० हजार रुपये जरी लक्झरी कारमध्ये वळवले तरी लक्झरी कारच्या मार्केटला फार मोठी गती येईल,” असे ते म्हणाले.

अय्यर यांच्या विधानावर ट्विटरवर चांगलीच चर्चा सुरू आहे. कोटक एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शहा म्हणाले, “SIPच्या माध्यमातून नागरिकांना चांगला परतावा मिळतो आणि त्यांना हवे ते खरेदी करण्याचे वित्तीय स्वातंत्र्य मिळते. महिन्याला ५० हजार रुपयांची गुंतवणूक जर SIPमध्ये केली तर भविष्यात नक्कीच लक्झरी कार घेता येईल, पण निव्वळ ५० हजारचा EMI भरतो म्हटले तर तो लक्झरी कार घेण्यासाठी पुरेसा नाही.”

हेही वाचा

Back to top button