शिवसेना कुणाची? : ठाकरे गटाकडून सुमारे ३ लाख प्रतिज्ञापत्र सादर

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा-केंद्रीय निवडणूक आयोग शिवसेना कुणाची? यासंबंधी लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही गटांनी शिवसेनेवर केलेल्या दाव्यासंबंधीत पक्षाचे कागदपत्रे सादर करण्यासाठी आयोगाने दिलेली मुदत संपली आहे.दोन्ही गटांकडून आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करण्यात आलेली असली तरी यात ठाकरे गटाने आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे.

उद्धव ठाकरेंच्या गटाकडून सर्वाधिक कागदपत्रे जमा करण्यात आली आहे.आतापर्यंत ठाकरे गटाने १८२ राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे पत्र, जवळपास २ लाख ८३ हजार पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र तसेच जवळपास १५ लाख प्राथमिक सदस्य नोंदणी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगात त्यामुळे ठाकरे गटाचे पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे.बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाकडून ७ लाख सदस्यांची नावे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे.त्यामुळे ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा दुप्पट सदस्यांची यादी दिली आहे.

शिवसेनेवर दोन्ही गटांनी दावा केल्यामुळे अंधेरी (पुर्व) पोटनिवडणुकीत आयोगाने पक्षाचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवत दोन्ही गटाला वेगवेगळी नावे दिली होती. यात ठाकरे गटाला मशाल तर शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आले होते.आता दोन्ही गटांनी कागदपत्र सादर केल्यामुळे आयोगाच्या प्रक्रियेनूसार या कागदपत्रांची छाननी केली जाईल,त्यानंतर निवडणूक आयोग गरज पडल्या संबंधित व्यक्तींना बोलवूनही घेऊ शकते.राज्यात येत्या काळात होवू घातलेल्या महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसंंबंधीचा वाद निकाली लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : 

 

 

Exit mobile version