किरीट सोमय्या-अर्थ राज्यमंत्री भेट, मुश्रीफ यांच्यावरील आरोपांविषयी झाली चर्चा - पुढारी

किरीट सोमय्या-अर्थ राज्यमंत्री भेट, मुश्रीफ यांच्यावरील आरोपांविषयी झाली चर्चा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Kirit Somaiya : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १२७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपांविषयी माहिती दिली.

उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ हे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि कुटुंबाच्या कंपन्यांद्वारे मनी लाँड्रिंग, बेनामी संस्था ठेवणे यासह करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारात गुंतले आहेत.

मुश्रीफ आणि कुटुंबाने कोलकाता स्थित शेल कंपन्यांशी व्यवहार करणाऱ्या कंपन्यांचे डझनभर जाळे तयार केले आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न प्राप्त करून त्यांच्या बँक खात्यांमध्ये आर्थिक व्यवहार केला जातो.

यामध्ये मुश्रीफ, त्यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा नाविद मुश्रीफ हे सहभागी असल्याची माहिती सोमय्या यांनी केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांना दिली.

सोमय्या यांनी डॉ. कराड यांच्यासह सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि आयकर विभाग–सीबीडीटी यांच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली.

यावेळी सोमय्या यांनी त्यांच्याकडे असलेले मुश्रीफ यांच्या घोटाळ्याचे कागदपत्र सादर केले. याप्रकरणी तपास सुरु करण्यात आल्याचे यंत्रणांनी आपल्याला सांगितल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

आमदार रोहित पवारांचा सोमय्यांना टोला

किरीट सोमय्यांना भाजपने ईडीचे प्रवक्ते असे एक अधिकृत पद द्यावे. सध्या त्यांच्याकडे केवळ एक प्रतिनिधी एवढेच पद आहे.

त्यांना प्रवक्ते केले तर ते ईडीचे प्रतिनिधी आहेत हे अधिकृत होऊन जाईल. ईडींना कळायच्या आधी त्यांना बऱ्याच गोष्टी कळत असतात.

त्यांच्यावर टीव्हीचा फोकसही असतो, त्यामुळे त्यांना हे पद द्यायला हरकत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी किरीट सोमय्या यांना लगावला.

गेल्या दोन दिवसांपासून ते दिल्लीत आहेत. दिल्लीत त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कर्जत-जामखेडमधील विकास कामांवर चर्चा केली.

Back to top button