आफताबने गांजा पिऊन श्रद्धाचा खून केला; डेहराडूनमध्येही शरीराचे तुकडे फेकले | पुढारी

आफताबने गांजा पिऊन श्रद्धाचा खून केला; डेहराडूनमध्येही शरीराचे तुकडे फेकले

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आफताबने श्रद्धाचा खून गांजा पिऊन केला. त्यानंतर तो बराच वेळ तिच्या मृतदेहाजवळ गांजा पीत बसला होता, असे आणखी चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, खुनाच्या आधी ते दोघे ज्या ठिकाणी गेले होते तेथे तपास करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

श्रद्धा वालकर खून प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यातून या हत्येमागचे क्रौर्य आणखीच बीभत्स होत चालले आहे. पोलिस आफताबकडून जास्तीत जास्त माहिती खोदून काढत आहेत. श्ाुक्रवारी त्यात नवी भर पडली. ती म्हणजे आफताबने आपण गांजा पिऊन श्रद्धाला संपवल्याचे सांगितले. 18 मे रोजी सायंकाळी श्रद्धासोबत कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर तो तावातावाने बाहेर पडला. बाहेर जाऊन त्याने गांजा ओढला. घरी परत आल्यावर चिडलेल्या श्रद्धासोबत पुन्हा वाद झाल्यावर आफताबने तिचा गळा आवळून खून केला. श्रद्धा गतप्राण झाल्यावर तो तिच्याशेजारीच गांजा पीत बसून राहिला. त्यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ते अघोरी कृत्य केले. आपण डेहराडूनमध्येही श्रद्धाच्या शरीराचे काही तुकडे फेकल्याचे त्याने सांगितले.

पोलिस पथके रवाना

श्रद्धाच्या खुनाचा घटनाक्रम जाणून घेण्यासाठी गुरुग्राम, उत्तराखंड, हिमाचल, मुंबई आदी ठिकाणी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

पती-पत्नी अशी ओळख दिली

ऑक्टोबर 2020 मध्ये वसईत रिगल अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भाड्याने घेताना आफताब व श्रद्धा यांनी आपण पती-पत्नी असल्याचे सांगितले होते. कमिशन एजंट व घरमालक यांना त्यांनी तशी ओळख करून दिली. भाडेकराराच्या कागदपत्रांवरही तीच नोंद आहे. या घरातही त्यांची नेहमी भांडणे व्हायची, असे शेजार्‍यांनी सांगितले.

शरीराचे तुकडे करायला 10 तास

आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतल्यावर मोठ्या सुर्‍याच्या साहाय्याने त्याने तिच्या शरीराचे तुकडे केले. हे निर्घृण कृत्य करण्यास त्याला तब्बल 10 तास लागले. या काळात तो सतत सिगारेट ओढत होता, बीअर पीत होता. भूक लागल्यावर ब्रेक घेत त्याने पदार्थ हॉटेलातून ऑनलाईन मागवले होते, असे तपासात समोर आले आहे.

प्लम्बरने श्रद्धाला बघितले होते

खून होण्याच्या काही दिवस आधी श्रद्धाला बाल्कनीत आफताबसोबत बघितले होते, असे राजेश या प्लम्बरने पोलिसांना सांगितले. मजल्यावर पाणी येत नसल्याने एकदा आफताबने आपल्याकडे विचारणा केली होती.

कचर्‍याच्या गाडीचा शोध लागला

आफताबच्या कबुलीजबाबानुसार त्याने त्याचे आणि श्रद्धाचे रक्तात माखलेले कपडे कचरा वाहून नेणार्‍या वाहनात टाकल्याचे म्हटले होते. त्यानुसार दिल्ली मनपा प्रशासन आणि उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज यांची तपासणी करण्यात आली. ते वाहन शोधण्यात यश मिळाले असून, पोलिसांनी आता कपड्यांची शोधाशोध सुरू केली आहे.

Back to top button